Friday, April 26, 2024
Homeनगर20 हजार ‘शक्तीवर्धक’ गोळ्यांचा साठा जप्त

20 हजार ‘शक्तीवर्धक’ गोळ्यांचा साठा जप्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट कंपनीत श्रीराम एजन्सीच्या नावे आलेल्या गर्भपाताच्या गोळ्या जप्त केल्यानंतर पोलिसांनी याच ठिकाणाहून श्रीराम एजन्सीच्या नावे आलेल्या ‘वाइल्डमोर- 100’ कंपनीच्या ‘शक्तीवर्धक’ गोळ्यांचा साठा जप्त केला आहे. पाच बॉक्समध्ये या 20 हजार गोळ्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक यांनी ही कारवाई केली.

- Advertisement -

5 मे, 2022 रोजी एमआयडीसी पोलीस व औषध प्रशासनाने सुमारे नऊ हजार गर्भपाताच्या गाळ्यांचा साठा जप्त केला होता. या प्रकरणी श्रीराम एजन्सीचा मालक नितीन जगन्नाथ बोठे (रा. टीव्ही सेंटर, सावेडी) आणि आयव्हीए हेल्थ केअर कंपनीच्या (पंचकूला, हरियाणा) संचालक मंडळाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. औषध प्रशासनाचे सहा. आयुक्त ज्ञानेश्वर दरंदले यांनी फिर्याद दिली होती.

उपनिरीक्षक पाठक या गुन्ह्याचा तपास करत आहेत. तपासादरम्यान ट्रान्सपोर्ट कंपनीत श्रीराम एजन्सीच्या नावे ‘शक्तीवर्धक’ गोळ्या आल्याची खबर एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. सहायक निरीक्षक आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे तपासी अधिकारी उपनिरीक्षक पाठक यांनी सदर गोळ्यांचा साठा तपासकामी जप्त केला आहे. पोलिसांकडून दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असून यामध्ये अनेक बाबी समोर येत आहेत. पोलीस तपासकामी हरीयाणा येथे कंपनीला भेट देणार आहेत.

औषध प्रशासनाने घेतले नमूने

‘वाइल्डमोर- 100’ कंपनीच्या ‘शक्तीवर्धक’ गोळ्या पोलिसांनी जप्त केल्यानंतर याबाबतची माहिती औषध प्रशासनाला देण्यात आली होती. औषध प्रशासनाचे सहा.आयुक्त ज्ञानेश्वर दरंदले यांनी गोळ्यांचे नमूने घेतले असून ते तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या