Friday, April 26, 2024
Homeनगरस्थायी, शिक्षण अन् जलव्यवस्थापन समितीची सभा तहकूब

स्थायी, शिक्षण अन् जलव्यवस्थापन समितीची सभा तहकूब

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेत शुक्रवारी स्थायी, शिक्षण आणि जलव्यवस्थापन समितीच्या मासिक विषय सभा होत्या.

- Advertisement -

या सभेत शिवेसेनेचे गट नेते तथा जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय अनिल कराळे यांना श्रध्दांजली वाहत या सभा तहकूब करण्यात आल्या.

जिल्हा परिषद सदस्य कराळे यांचे गेल्या आठवड्यात पुण्यात उपचार सुरू असताना निधन झाले. जिल्हा परिषदेच्या सभागृहातील बुलंद आवाज असणारे आणि सतत वेगवेगळे प्रश्न मांडणारे सदस्य म्हणून कराळे यांची ओळख होती.

कराळे यांच्या अकाली निधनाने जिल्हा परिषद प्रशासनासह पदाधिकारी सदस्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यातच काल जिल्हा परिषदेच्या तीन सभा ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आल्या होत्या. यात अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी आणि जलव्यवस्थापन समितीची सभा सुरू झाली.

यावेळी घुले यांनी दिवंगत सदस्य कराळे यांना श्रध्दांजली अपर्ण करून या दोन्ही सभा तहकूब केल्या. त्यानंतर उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती प्रताप पाटील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची सभा सुरू झाली. सुरूवातीला शेळके यांनी कराळे यांनी श्रध्दांजली वाहून सभा तहकूब केली.

स्वर्गीय कराळे यांच्या नावाने उपक्रम

शिक्षण समितीच्या सभेत सदस्य राजेश परजणे यांनी दिवंगत कराळे यांच्या नावे उपक्रम सुरू करण्याची मागणी केली. तसेच कराळे यांच्या गावात सुरू असणार्‍या शाळेला त्यांचे नाव देण्याची सूचना केली. याबाबत उपाध्यक्ष शेळके यांच्याशी चर्चा केली असता, दिवगंत कराळे यांच्या नावाने शिक्षण समितीत चर्चा करून नवीन उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

दोघा ग्रामसेवकांना सरकारची मदत

कोव्हिड काळात कर्तव्य बजावताना निधन झालेल्या दोन ग्रामसेवकांना राज्य सरकारकडून 50 लाख रुपयांचा विमा मदत जाहीर करण्यात आली आहे. यात बाळासाहेब वैराळ ग्रामविकास अधिकारी वाळकी ता. नगर आणि प्रशांत आहेर ग्रामसेवक वारणवाडी-नांदूर पठार ता. पारनेर यांचा समावेश आहे. याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी ग्रामविकास विभागाने काढले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या