Friday, April 26, 2024
Homeनगरराज्यमार्गावरील झाडे देताहेत अपघाताला निमंत्रण

राज्यमार्गावरील झाडे देताहेत अपघाताला निमंत्रण

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

वसई-गेवराई राज्यमार्ग क्रमंक 44 च्या बाभळेश्वर ते नेवासाफाटा या मार्गावरील राज्यमार्गाच्या रुंदिकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी धुमधडाक्यात उद्घाटन करून कामाला हिरवा झेंडा दाखवत कामाला गती दिली आहे. मात्र रुंदीकरणाच्या सुरू असलेल्या कामात आड येणार्‍या झाडांची कटींग केली जात नसल्याने राज्यमार्गावर झाडे की झाडातून राज्यमार्ग ,असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यमार्गावर येणारी झाडे भविष्यात अपघाताला निमंत्रण देणारी ठरणार असल्याने राज्यमार्गाच्या रुंदीकरणास अडथळा ठरणारी झाडे काढून संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी वाहन धारकांकडून केली जात आहे.

- Advertisement -

राज्यमार्ग क्रमांक 44 ची गेल्या काही वर्षांपासून अत्यंत दुरवस्था झालेली होती. नगर मनमाड व पुणे औरंगाबाद या दोन महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा जवळचा हा राज्यमार्ग आसल्याने या राज्यमार्गावर दिवस रात्र वाहनांची मोठी वर्दळ असते. मराठवाड्यातून ऊस वाहतूक करणारी शेकडो वाहने याच रस्त्यावरून धावत असतात तर शिर्डीत येणारे लाखो भाविकही याच मार्गावरून जात-येत आसतात. रस्त्याची दुरवस्था झाल्याने अनेक अपघातांची मालिका या राज्यमार्गावर सुरू होती. त्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी सातत्याने केली जात होती. श्रीरामपूरचे आ. लहु कानडे यांनी या मागणीची दखल घेत राज्यमार्गाच्या रुंदिकरणासाठी सुमारे शंभर कोटीपेक्षा जास्तीचा निधी मंजूर करून घेतला आहे. नुकताच श्रीरामपूर तालुक्यातून जाणार्‍या राज्यमार्गाच्या कामाचे उद्घाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते तर नेवासा तालुक्यातून जाणार्‍या राज्यमार्गाच्या कामाचे उद्घाटन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याहस्ते होऊन रस्त्याच्या कामाला गती दिली आहे.

सध्या या राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. राज्यमार्गाच्या दुतर्फा तत्कालीन ब्रिटीश सरकारने लावलेली झाडे सुमारे 100 वर्षांपेक्षा जास्त वयाची झाल्याने मोठमोठी झालेली आहेत. आतापर्यंत या राज्यमार्गाचे डांबरीकरण 20 फुटाचे होते. मात्र रुंदीकरणाच्या कामात आता ते 32 फुटाचे झालेले आहे. दुतर्फा 5 फुटाचा साईड पट्टा व 5 फूट नाली असल्याने राज्यमार्गाचे रुंदीकरण 50 फुटापेक्षा जास्त झालेले आहे. त्या प्रमाणात निधीही उपलब्ध झालेला आहे. मात्र वाढत्या रुंदीकरणानुसार या राज्यमार्गावरील बेलपिंपळगाव फाटा, पाचेगाव फाटा, टाकळीभान, भोकर व वडाळा महादेव परीसरात मोठमोठी झाडे रस्त्याच्या रुंदिकरणाच्या आड येत असल्याने अनेक ठिकाणी रस्त्याची निविदेप्रमाणे असलेली रुंदी कमी होणार आहे. काही ठिकाणी ही झाडे 20 ते 22 फुटाच्या अंतरातच आसल्याने ही झाडे थेट राज्यमार्गातच येत आहेत तर काही ठिकाणी झाडाच्या दुसर्‍या बाजुला रस्ता जात असल्याने ही झाडे थेट रस्त्यातच येत आहेत.

ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीकडे चौकशी केली असता, झाडे कटींगची परवानगी नसल्याचे सांगितले जाते. मात्र ही झाडे राज्यमार्गातच असल्याने अचानक समोर आलेल्या झाड हुकवण्याच्या नादात चालकाचा वाहनाच्या वेगावरील ताबा अनियंत्रित होऊन अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे झाडं वाचवण्याच्या नादात वाहनचालकाच्या जिवीतास धोका संभवतो. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य निर्णय घेऊन अपघात टाळावेत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या