Thursday, April 25, 2024
Homeनाशिकराज्य मंत्रिमंडळ विस्तार रखडला; नाशिकच्या वाट्याला पुन्हा निराशा

राज्य मंत्रिमंडळ विस्तार रखडला; नाशिकच्या वाट्याला पुन्हा निराशा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सरकारला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आला आहे. दोन्ही पक्षाच्या सरकारला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटानेदेखील पाठिंबा मिळाला आहे. त्यांच्या नऊ आमदारांना मंत्रीपदाची शपथही देण्यात आली आहे. मात्र खाते वाटपासह मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा रखडल्यामुळे नाशिकच्या वाटेला पुन्हा निराशा आल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

महायुती सरकारचा तिसर्‍या टप्प्यातील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनाआधी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र,आता मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता मावळली असून राज्य सरकारचा तिसर्‍या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मंत्रीपदी विराजमान होण्याचे स्वप्न बघणार्‍या आमदारांना आता काही काळ थांबावे लागणार आहे. तर राष्ट्रवादीच्या नवीन मंत्र्यांचे रखडलेले खातेवाटप पावसाळी अधिवेशनाआधी मार्गी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात नाशिकच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांपैकी एखाद्याला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे, पश्चिम विभागाच्या सीमा हिरे, पूर्व विभागाचे राहुल ढिकले यांच्यासह चांदवड मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या नावाची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. आताच्या विस्तारात नाशिकला संधी मिळणार अशी शक्यता असताना पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्ष उलटले तरी अद्याप सरकारचा दुसरा टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अशातच 10 दिवसांपूर्वी अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. तर अजित पवारांनी स्वतः उपमुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. परंतु, अद्याप कोणत्याही नवीन मंत्र्याला खाते देण्यात आलेले नसल्याने खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे मंत्रीपदावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

नाशिकचे पालकमंत्री भुसेच

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या पाठिंब्यानंतर तसेच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे नाशिकचे पालकमंत्री बदलण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर भुजबळ हे पालकमंत्री होणार असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यासह भाजपचे गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही नावाची चर्चा असून काही प्रमाणात अजित पवार स्वतः नाशिकचे पालकमंत्री होणार असे देखील बोलले जात होते, मात्र मिळालेल्या माहितीनुसार नाशिकचे पालकमंत्री पद दादा भुसे यांच्याकडेच राहणार असल्याचे समजते. अगोदरच मुंबईला सुरू असलेले खलबत्ते त्यातच पालकमंत्री बदलायचे झाले तर नवीन वाद नको म्हणून ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या