Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपथ विक्रेत्यांना कर्ज वाटपास प्रारंभ

पथ विक्रेत्यांना कर्ज वाटपास प्रारंभ

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी विशेष सूक्ष्म-पतपुरवठा सुविधा योजने अंतर्गत शहरातील पथ विक्रेत्यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचे कर्ज वितरणास नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्याधिकारी संजय केदार यांचे हस्ते प्रारंभ करण्यात आला. यासाठी भारतीय स्टेट बँकेने अवघ्या 7 टक्के व्याज दराने हे कर्ज उपलब्ध करुन दिले आहे.

- Advertisement -

यावेळी गटनेते हेमंत वाजे, स्टेट बँकेचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विद्याधर कुलकर्णी, उपव्यवस्थापक पल्लव मावळे, रचना तिवारी, नगरसेवक पंकज मोरे, उदय गोळेसर उपस्थित होते. प्रकाश घुगे, विनायक गरगटे, मंगेश मुत्रक यांंना प्रत्येकी 10 हजार रुपयेचे कर्ज प्रातिनिधीक स्वरुपात वितरीत करण्यात आले.

कोविड -19 चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे फेरीवाला व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे हाल झाले असून त्यांना व्यवसाय पुनः सुरु करता यावा यासाठी केंद्र शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे. सिन्नर शहराच्या शहरी भागात पथविक्री करणा-या व दि. 24 मार्च 2020 या तारखेच्या पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या, सर्वेक्षण झालेल्या आणि न झालेल्या, शहरात व्यवसाय करणाऱ्या सर्व पात्र पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून प्रत्येकी 10 हजार रुपयांचे वार्षिक खेळते भांडवल कर्ज स्वरुपात दिले जाणार आहे.

या कर्जाची नियमित फेड केल्यास 7%च्या वरील व्याज भरणेकामी अनुदान व इतर लाभ लाभार्थ्यांना प्राप्त करता येणार आहेत. यासाठी बँकेला कोणत्याही प्रकारचे तारण द्यावे लागणार नाही. मुदतीत कर्ज परतफेड केल्यास वाढीव मुदतीसह दुबार कर्ज पुरवठा केला जाणार आहे.

यासाठी मागणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने शहर पथविक्रेता समिती व अंमलबजावणी समितीकडे करता येणार आहेत. या योजने अंतर्गत आजपर्यंत 66 अर्ज प्राप्त झालेे असून सर्व पात्र पथविक्रेत्यांना कर्ज मिळणार आहे. या योजनेचा सिन्नर शहरातील सर्व पथविक्रेत्यांनी लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन शहर अभियान व्यस्थापन कक्षाचे व्यवस्थापक अनिल जाधव, अर्जुन भोळे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या