Thursday, April 25, 2024
Homeनगरसभापती कोतकर नेमके कोणाचे?

सभापती कोतकर नेमके कोणाचे?

अहमदनगर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतरही महापालिकेतील सभापती मनोज कोतकर यांनी भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांचा महापौरांच्या साक्षीने सत्कार केला. पक्षांतराची घोषणा केलेल्या कोतकरांवर भाजप खरंच कारवाई करणार का? यासह कोतकर नेमके कोणाचे? या प्रश्नांनी नगरकरांचे डोके चक्रावले आहे.

महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर तथा कोतकरांवर कारवाईचे अधिकार असलेल्या गटनेत्या मालनताई ढोणे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष कुमारसिंह वाकळे यांच्या साक्षीने सभापती कोतकर यांनी शिवाजी कर्डिले यांचा सत्कार केला. त्यामुळे सभापती कोतकर यांचा पक्ष नेमका कोणता? या प्रश्नाचे उत्तर शोधताना नगरकर चक्रावून गेले आहे.

- Advertisement -

सभापती मनोज कोतकर हे भाजपच्या चिन्हावर केडगावातून निवडून आले आहेत. स्थायी समिती सभापती पद मिळविण्यासाठी त्यांनी अचानक भाजपातून राष्ट्रवादी प्रवेश केल्याचे घोषित केले. अचानकच्या या पक्षांतरामुळे भाजपने कोतकर यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यान्वये कारवाईचा निर्णय घेतला. अर्थात प्रदेश नेत्यांनी स्थानिक भाजप नेत्यांचे कान उपटल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या कायद्यानुसार गटनेत्यांना कारवाईचे सर्वाधिकार आहेत. शहराध्यक्ष भैय्या गंधे यांनीही कोतकर यांच्यावर कारवाई करावी अशी सूचना गटनेत्या ढोणे यांना दिली आहे. ढोणे यांनी मात्र यासदंर्भात पुढे कोणतीच कारवाई केली नाही. कारवाई प्रलंबित असतानाच सभापती कोतकर यांनी आज भाजप नेते शिवाजी कर्डिले यांचा सत्कार केला. गटनेत्या, महापौरांसमक्ष कोतकर यांनी कर्डिले यांचा सत्कार करून दबावतंत्राचा अवलंब तर केला नाहीना असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादीचे कुमारसिंह वाकळे व भाजप महापौरांच्या साक्षीने कोतकर यांनी कर्डिलेंचा सत्कार केल्याने कोतकरांचा पक्ष नेमका कोणता? याविषयी चर्चेला उधान आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या