Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगरान पिंगळा - नाशिक जिल्ह्यातील संवर्धन कार्य

रान पिंगळा – नाशिक जिल्ह्यातील संवर्धन कार्य

प्रतिक्षा कोठूळे

आययूसीएन रेड डेटा बुकमध्ये असलेले उल्लू किंवा घुबड किंवा रान पिंगळा अत्यंत धोकादायक 200 पक्ष्यांपैकी एक आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असणारे रान पिंगळा नाशिकच्या जवळील त्र्यंबकेश्वर वन परिक्षेत्रात NCSN च्या बिश्वरूप राहा यांनी 2016 साली पहिल्यांदा पाहिले. या आधी तानसा आणि पूरणा अभयारण्यात कायम वास्तव्यास असलेला हा रान पिंगळा पक्षी त्र्यंबकेश्वर जंगल परिसरात आता आढळू लागला आहे.

- Advertisement -

गेल्या 14 वर्षांपासून, एनसीएसएन आदिवासी भागांमध्ये जाऊन तेथील मुलांना पक्ष्यांविषयी, जंगलांविषयी, झाडांविषयी जनजागृती निर्माण करत आहे. अजूनही हे कार्य नियमितपणे सुरू आहे. याचा असा फायदा झाला की तेथील भागांमध्ये मुलांद्वारे गुलोर वापरणे पूर्णपणे बंद झाली. ज्यामुळे दोन ते तीन तासांत वन्य पक्ष्यांच्या 50-60 प्रजाती दिसू लागल्या. स्थानिक लोकांनी देखील शिकार करणे थांबवले आहे. ते वन विभागास संवर्धनात मदत करीत आहे. आता परिसरात रान पिंगळाचे नियमित दर्शन होते ते फक्त NCSN यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे.

आवाजाची नक्कल धोकादायक

खर्गला म्हणून संस्कृत या भाषेत ओळखला जाणारा हा पक्षी दिसायला शिंगी डुमासारखा, पण आकाराने लहान व आखूड शेपटीचा असतो. तो पानगळीच्या आर्द्र जंगलात व ओढ्यानजीकच्या जुन्या आमरायांत आढळतो. पश्चिम खान्देश, सूरत, डांग, सातपुड्यापासून पूर्वीय मध्य प्रदेश व ओरिसातील संबलपूर जिल्ह्यात तो दिसतो, अशी माहिती मारुती चितमपल्ली यांच्या पक्षीकोशावरून मिळते. तो पिंगळा गटातील अन्य पक्ष्यांप्रमाणे केवळ रात्रीच संचार करीत नाही, तर त्याला दिवसाही दिसते. तो निर्भयपणे इकडे तिकडे जंगलात, माळरानावर, ओढे-नद्यांकाठी फिरतो. पण त्याचा हाच गुण त्याच्या नाशाला कारण ठरत आहे. कारण इतर पिंगळ्यांना जसे अंधाराचे संरक्षण मिळते तसे ते याला मिळत नाही. दिवसाउजेडी तो एखाद्या छोट्या मोठ्या शिकाऱ्याकडून सहज मारला जातो, तसेच काही लोक फोटो काढण्यासाठी या पक्ष्याच्या आवाजाची जंगलात जाऊन नक्कल करतात, हे सुद्धा त्यांच्या अधिवासाला धोका आहे.

पक्ष्याचा प्रजनन काळ

पक्ष्याचा प्रजनन काळ ऑक्टोबर ते मार्च दरम्यान असतो. मादी झाडांच्या ढोलीत किंवा घरट्याच्या तळाशी 2 – 3 पांढरट रंगाची अंडी घालते. अंडी उबवण्यापासून ते पिलांच्या संगोपणाचे सगळे काम नर आणि मादी मिळून करतात.

उंदीर, सरडे, पाली, मोठे कीटक, नाकतोडे, छोटे साप, छोटे पक्षी इत्यादी त्याचे खाद्य. SACON च्या टीम ने नाशिकमध्ये 2018 साली जेव्हा या पक्ष्यांचे निरीक्षण केले. तेव्हा त्यांना 4 रान पिंगळे त्यांच्या निरीक्षणात सापडले होते. आता या पिंगळ्याचे नियमित निरीक्षण होते आणि रान पिंगळाचे संवर्धन या विषयावर गेल्या वर्षी SACON ने एक 5 दिवसीय परिषद सुद्धा आयोजित केली होती. ज्यात BNHS चा सुद्धा सहभाग होता आणि या वेळी NCSN ने सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवला होता. यामध्ये प्रामुख्याने रान पिंगळा विषयी माहिती, त्यास असणारे ढोके आणि संवर्धन करावे याविषयी चर्चा सत्र आयोजित केले होते.

रान पिंगळा हा पक्षी फक्त भारतात मध्य भारतात अधिवास करतो इतर कोणत्याही ठिकाणी तो आढळत नाही आणि याला भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार Scheduled 1प्रजातींच्या यादी मध्ये गणना केली आहे. त्यामुळे तो ज्या पण जंगलांमध्ये आढळतो त्या जंगलाला संरक्षित क्षेत्रचा दर्जा मिळाला पाहिजे. या पक्ष्याचे संरक्षण झाले पाहिजे जेणेकरून या पक्ष्याचा अधिवास अजून वाढेल असं NCSN ला वाटते आणि या गोष्टीचा वन विभागाने देखील विचार करायला हरकत नाही.

नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या