Thursday, April 25, 2024
Homeनगरक्रीडा संकुल पळविणार्‍यांचे आरोप अपयश झाकण्यासाठीच- रणशिंग

क्रीडा संकुल पळविणार्‍यांचे आरोप अपयश झाकण्यासाठीच- रणशिंग

कोपरगाव |प्रतिनिधी|Kopargav

ज्यांनी 2002-03 साली कोपरगाव शहरातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी मंजूर झालेले क्रीडा संकुल स्वत:च्या फायद्यासाठी आपल्या सैनिकी शाळेजवळ पळविले त्यांनीच दुसर्‍यावर आरोप करणे म्हणजे स्वत:चे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका माहेगाव देशमुखचे उपसरपंच विकास रणशिंग यांनी केली आहे.

- Advertisement -

शिंगणापूरच्या सरपंच पतींनी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांचे अपयश झाकण्यासाठी शिंगणापूरचे प्राथमिक आरोग्य केंद्र माहेगाव देशमुखला पळविल्याचा बिनबुडाचा आरोप ना. काळे यांच्यावर केला आहे. त्या आरोपाचा उपसरपंच विकास रणशिंग यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

श्री. रणशिंग यांनी म्हटले आहे, मागील पाच वर्षात राज्यापासून केंद्रापर्यंत स्व पक्षाचे सरकार असतांना जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास मागील दोनच वर्षात ना. आशुतोष काळे यांनी करून दाखविला आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावाला ना. काळे यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात समावून घेतल्यामुळे प्रत्येक गावात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आदी विकासकामे सुरू आहेत. मात्र ज्यांना सध्या काहीच काम नाही, ज्यांच्याकडे होत असलेला विकास पाहण्याची मानसिकता नाही त्यांच्याकडून सध्या बिनबुडाचे आरोप करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे.

माहेगाव देशमुखला मंजूर करण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व नियमांच्या निकषात बसल्यामुळे मंजूर झाले आहे. तुम्ही शिंगणापूरच काय, पण पाहिजे त्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणू शकत होता. कारण राज्यात व केंद्रात तुमच्या पक्षाचे सरकार होते. मात्र केंद्रात व राज्यात आपल्या पक्षाचे सरकार असून उपयोग नाही त्यासाठी पाठपुरावा देखील तेवढाच महत्वाचा आहे. मागील पाच वर्ष माजी आमदारांनी फक्त निवेदन देवून, फोटोसेशन करण्यात घालविले. मात्र याउलट ना. काळे यांनी निवडून आल्यापासून मतदार संघाच्या विकासाचा अभ्यास करून शासनदरबारी अनेक विकासकामांचे प्रस्ताव सादर करून प्रत्येक प्रस्तावांचा पोटतिडकीने पाठपुरावा करून निधी मिळवीत आहे याचे खरे विरोधकांना दु:ख आहे.

फक्त राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना देखील ना. काळे यांनी मतदार संघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला. केंद्रात देखील आघाडीचे सरकार असते तर निश्चितपणे अधिकचा निधी मिळविण्यात ना. काळे यशस्वी झाले असते व विकासाच्या बाबतीत कोपरगाव अजून पुढे गेले असते. हे जनतेला समजले असून कार्यक्षम लोकप्रतिनिधी निवडून दिल्याचे समाधान आहे. क्रीडा संकुल पळविले तेच आता प्राथमिक आरोग्य केंद्र पळविण्याचा आरोप करून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उपसरपंच विकास रणशिंग यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या