Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रखेळ हा सर्वसामान्‍यांच्‍या जीवनशैलीचा भाग व्‍हायला हवा - किरेन रिजिजू

खेळ हा सर्वसामान्‍यांच्‍या जीवनशैलीचा भाग व्‍हायला हवा – किरेन रिजिजू

पुणे |प्रतिनिधी|Pune

खेळ हा सर्वसामान्‍यांच्‍या जीवनशैलीचा भाग व्‍हायला हवा, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा कार्यक्रम आणि युवा मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केले.

- Advertisement -

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्‍ये खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचे लोकार्पण झाले. त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री आदिती तटकरे, पिंपरी-चिंचवडच्‍या महापौर उषा ढोरे, खासदार गिरीश बापट, क्रीडा आयुक्‍त ओम प्रकाश बकोरिया यांची प्रमुख उपस्थिती होती.

रिजीजू म्‍हणाले, देशात क्रीडा संस्‍कृती पुरातन कालापासून आहे. तिची जोपासना होण्‍याची गरज आहे. खेळ हा आपल्‍या जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे. देशात आणि राज्‍यातही क्रिडा क्षेत्राची वाढ होण्‍यासाठी केंद्र शासनाच्‍यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आजी आणि माजी खेळाडूंना आर्थिक मदत करणे, हाही त्‍या प्रयत्‍नांचा एक भाग आहे. महाराष्‍ट्राला क्रीडा क्षेत्रासाठी केंद्र शासन सर्वतोपरी मदत करेल,असेही त्‍यांनी सांगितले.

राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्‍हणाले, राज्‍य शासन विद्यार्थ्‍यांमध्‍ये खेळांची आवड निर्माण व्‍हावी, म्‍हणून व्‍यापक प्रयत्‍न करत आहे. खेळ आणि खेळाडू यांच्‍या पाठीशी राज्‍य शासन खंबीरपणे उभे आहे. केंद्र शासनाने क्रीडा क्षेत्रासाठी भरीव मदत करावी, असे आवाहनही त्‍यांनी केले.

राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी राज्‍य शासन क्रीडा क्षेत्रात राबवत असलेल्‍या योजनांची माहिती दिली. पुण्‍यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलाने क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रभावशाली भूमिका बजावलेली आहे. १५१ एकर परिसरात वसलेल्या या क्रीडा संकुलाची सुरुवात १९९४ साली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने झाली.

त्यानंतर सन २००८ मध्ये या संकुलातील क्रीडा सुविधांमध्ये भर घालून व अद्ययावत करुन, याठिकाणी तिसऱ्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याशिवाय या क्रीडा संकुलामध्ये ब्राझिलने विजेतेपद संपादन केलेल्या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ गट पुरुष जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, ग्रॅण्ड प्रिक्स, टेबल-टेनिस सर्किट स्पर्धा, आशियाई कॅडेट कुस्ती स्पर्धा, आशियाई बास्केटबॉल स्पर्धा (१६ वर्षाखालील मुली) आणि २०१९ मध्ये दुस-या खेलो इंडिया स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आल्‍याचेही राज्‍यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या