Friday, April 26, 2024
Homeक्रीडाब्रह्मगिरी सायकल परिक्रमेत 205 सायकलिस्ट्सचा उत्स्फूर्त सहभाग

ब्रह्मगिरी सायकल परिक्रमेत 205 सायकलिस्ट्सचा उत्स्फूर्त सहभाग

नाशिक । प्रतिनिधी Nashik

श्रावणमास व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काल रविवारी (दि.20) नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशनने ब्रह्मगिरी सायकल परिक्रमा आयोजित केली. या परिक्रमेत 205 सायकलिस्टने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सायकलिस्ट फाउंडेशनच्या या आगळ्यावेगळ्या परिक्रमेत डोंबिवली, पुणे, वैजापूर, देवळा, सटाणा आदी भागातून सायकल रायडर्स सहभागी झाले.

- Advertisement -

मनपाचे माजी शहर अभियंता यू. बी .पवार यांच्या संकल्पनेतून या परिक्रमेची मुहूर्तमेढ रोवली गेली. यंदाचे हे ब्रह्मगिरी सायकल परिक्रमेचे 11वे वर्ष होते. सकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली, तरीदेखील सर्व रायडर्स वेळेवर सकाळी 6 वा. अनंत कान्हेरे मैदान येथे पोहोचले. विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून परिक्रमेला प्रारंभ करण्यात आला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

यावेळी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे उपाध्यक्ष अरुण पवार, डॉ.मनिषा रौंदळ, सचिव संजय पवार, संचालक दीपक भोसले, बजरंग कहाटे, माजी अध्यक्ष किशोर माने उपस्थित होते. विभागीय महसूल आयुक्त गमे सपत्नीक सहभागी झाले होते. ‘बम बम भोले’, ‘हर हर महादेव’च्या जयघोषात राईडला सुरुवात करण्यात आली. संपूर्ण त्र्यंबकरोड सायकलिस्टच्या घोषणांनी दुमदुमून गेला. निसर्गरम्य वातावरणात, पावसाच्या आगमनामुळे सायकलिस्टला अधिकच ऊर्जा मिळाली. ठिकठिकाणी हायड्रेशन पॉईंटची व्यवस्था केली होती.

भक्ती व शक्ती या दोघांचा मेळ असणारी ही सायकल परिक्रमा भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. विशेष म्हणजे पर्वतावर अहिल्या गौतम ऋषी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायर्‍या आहेत. त्या मार्गात सायकल खांद्यावर उचलून घेत सायकलिस्टने मंदिर गाठले. विभागीय आयुक्तांनीदेखील सायकल खांद्यावर उचलून परिक्रमा पूर्ण केली. महिला व जेष्ठ सायकलिस्टनेसुद्धा ही आव्हानात्मक परिक्रमा पूर्ण करीत निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला. नाशिक-अंजनेरी-पहीणे-कोजुली-अहिल्या गौतम ऋषि मंदिर-सापगाव फाटा-त्र्यंबकेश्वर नाशिक अशी ही 76 कि.मी. ची राईड यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल बारामती सायकलिस्ट क्लबच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकर्षक मेडल देण्यात आले.

हा कार्यक्रम परतीच्या मार्गावर ग्रेप कांउटी येथे घेण्यात आला. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, भारती गमे, सायकलप्रेमी किरण चव्हाण व सुवर्णा चव्हाण यांच्या हस्ते सायकलप्रेमींना मेडल प्रदान केले. परिक्रमेचे आयोजन करण्यासाठी यू.बी. पवार, माजी उपाध्यक्ष जे.एस. पवार, संचालक दीपक भोसले, भाऊसाहेब काळे यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या