Wednesday, April 24, 2024
Homeनगरतपासणीत त्रुटी आढळल्याने 'या' कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित

तपासणीत त्रुटी आढळल्याने ‘या’ कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित

नेवासाफाटा |प्रतिनिधी| Newasa Phata

कृषी सेवा केंद्रात युरिया खत उपलब्ध असतानाही ते न दिल्याबाबत शेतकर्‍याने केलेल्या तक्रारीची दखल घेवून तालुका कृषी अधिकार्‍यांनी संबंधीत कृषी सेवा केंद्राची तपासणी केली असता तिथे आढळलेल्या त्रुटींमुळे जिल्हा कषि अधिकार्‍यांनी सोनईतील या कृषी सेवा केंद्राचा परवाना तात्पुरता (5 फेब्रुवारी पर्यंत) निलंबीत केला.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, सोनई येथील शेतकरी प्रमोद घावटे यांनी सोनईतील निलेश कृषी सेवा केंद्राकडे युरिया खताची मागणी केली होती. खत शिल्लक नसल्याचे कृषि सेवा केंद्र चालकाने सांगितल्यावर त्याबाबत त्यांनी 21 डिसेंबर रोजी तक्रार केली होती. यानुसार 29 डिसेंबर रोजी भरारी पथकामधील तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय डमाळे, पंचायत समितीचे कृषि अधिकारी प्रताप कोपनर व घोडेगाव मंडळाचे कृषि अधिकारी श्री. सोनवणे यांनी संयुक्तपणे तपासणी केली.

तपासणीमध्ये विक्री परवान्यामध्ये गोदामाचा समावेश न करणे, खरेदी बीले उपलब्ध नसणे, साठा रजिस्टर व प्रत्यक्ष साठा न जुळणे, साठाफलक प्रदर्शित न करणे, विहीत नमुन्यात विक्री बीले न देणे, विक्री बिलावर शेतकर्‍यांची स्वाक्षरी न घेणे आदी गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे खत विक्री परवान्यावर कारवाई होणेबाबतचा प्रस्ताव अधिक्षक कृषि अधिकारी यांचेकडेस सादर केला होता.

याबाबत अधिक्षक जिल्हा कृषी अधिकारी यांनी 16 जानेवारी रोजी सुनावणी घेतली. त्यावेळी तक्रारदारास त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यांसह म्हणणे मांडण्याची संधी दिली. मात्र तक्रारदार हजर राहून पुरावे सादर करु शकले नाहीत.

त्यामुळे मे. निलेश कृषि सेवा केंद्र, सोनई यांनी रासायनिक खत नियंत्रण आदेश 1985 मधील खंड 4 (अ) व (ब), खंड 35 (1), 35 (2), खंड 35 (1) (ब), खंड 5 व परवाना अटी व शर्तींचे उल्लंघन केले म्हणून खते परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी निलेश कृषि सेवा केंद्राचा खत विक्री परवाना 23 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2023 या कालावधीसाठी तात्पुरता निलंबित केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या