Friday, April 26, 2024
Homeनगरघनकचरा ठेकेदाराविरुध्द गुन्हा दाखल करणार - मुख्याधिकारी

घनकचरा ठेकेदाराविरुध्द गुन्हा दाखल करणार – मुख्याधिकारी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगर परिषद हद्दतील घनकचरा व्यवस्थापाचा ठेकेदार परवडत नाही म्हणून अर्धवट काम सोडून गेल्यामुळे त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा,

- Advertisement -

अशी मागणी विशेष सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली. त्यावर मुख्याधिकार्‍यांनी या ठेकेदाराविरुध्द तातडीने गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. तसेच नवीन निविदाप्रक्रिया लवकरात लवकर काढून शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावला जाईल. तसेच मागील ठेकेदाराबरोबर सहभागी नगरसेवक कोण? अशी चर्चा सभागृहात चांगलीच रंगली.

श्रीरामपूर नगरपरिषदेची शहर हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन कमाच्या निविदा प्रक्रियेबाबत विचारविनिमय करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्रीरामपूर शहरातील स्वच्छतेच्या कामाकाजासाठी बोलाविण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत काल मुख्याधिकारी 15 दिवसाची रजा टाकून गेल्यामुळे काल शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी श्रीरामपूर पालिकेच्या मख्याधिकार्‍यांचा प्रभारी कार्यभार सांभाळला.

शहरातील एवढ्या मोठ्या स्वच्छतेचा प्रश्नाबाबत विशेष सभा बोलाविण्यात आली असता मुख्याधिकारी रजेवर गेलेतच का? असा प्रश्न नगरसेवक मुजफ्फर शेख व दिलीप नागरे यांनी विचारला असता नगराध्यक्षा म्हणाल्या काल सायंकाळी आजाराबाबतची 15 रजा टाकून गेले आहेत. त्यावर ते खरोखरच आजारी होते का? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी श्री. शेख व श्री. नागरे यांनी केली.

श्रीरामपूर पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन ठेकेदार हा काम सोडून गेला असून त्याच्याविरुध्द अद्याप पालिकेने काय कारवाई केली, असा प्रश्न संजय फंड यांनी विचारुन अशा ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे अशी मागणी केली. त्यावर नगराध्यक्षा म्हणाल्या कारवाई करण्याबाबतचे पत्र मी जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीने मुख्याधिकार्‍यांना दिले होते. याबाबत कालही त्यांना पुन्हा पत्र दिले. ठेकेदाराविरुध्द कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी डोईफोडे यांनी सांगितले.

या ठेक्यापोटी ठेकेदाराकडून पालिकेने केवळ 1 लाख रुपये अनामत रक्कम घेतल्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. ठेका घेतेेवेळी त्याची पूर्ण चौकशी केली का? त्याची बँक गॅरंटी पाहिली काय? असे प्रश्न सौ. भारती कांबळे, मुजफ्फर शेख यांनी उपस्थित केला.

श्रीरामपूर नगरपालिकेत ठेकेदार का टिकत नाही? त्याला कोणी पळवून लावले जाते का? हा ठेकेदाराचा ठेका नेमका कोण चालवतो? ठेकेदाराला त्रास कोण देतो याची चौकशी झाली पाहिजे, अशी राजेश अलघ यांनी करून ठेकेदाराकडून घनकचरा खत निर्मितीचे काम व्यवस्थीत होते की नाही याबाबत कोणालाच माहित नसते.

कोणी हजर असते की नाही, किती कचरा टाकला जातो तसेच ठेकेदारावर नजर ठेवले जावे यासाठी त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी मागील दोन तीन सभेत केली होती. मात्र तशी कोणतेही कार्यवाही झाली नाही. असे नगरसेवक राजेश अलघ यावेळी म्हणाले.

यावेळी पालिकेने स्वच्छतेचा ठेका कितीपर्यंत दिला जावा म्हणून पालिकेने नियोजन करावे. त्यावर पालिकेने संपूर्ण हिशोब केला असता सदरचा ठेका साडे पंचवीस लाखापर्यंत देण्यास काहीच हरकत नसल्याचे मुख्याधिकारी डोईफोडे यांनी सांगितले.

यावेळी चर्चेत किरण लुणीया, मुक्तार शहा, प्रकाश ढोकणे, भारती परदेशी, दिपक चव्हाण, वैशाली चव्हाण, राजेंद्र पवार, जितेंद्र छाजेड यांनी सहभाग नोंदवला होता.

नगराध्यक्षा आपण शहराच्या हितासाठी खुप चांगले काम करत आहात. मात्र आपल्या सभोवताली जी लोक आहेत ते आपली दिशाभूल करत असतात. त्यांच्यामुळे आपली बदनामी होत असते. आपण अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे. यांच्यामुळे आपली बदनामी होवून आपले नाव खराब करण्याचा प्रयत्न या लोकांकडून होत आहे. आपण वेळीच याबाबत सावध राहिला नाहीत तर आपल्याला चांगल्याच बदनामीला सामोरे जावे लागेल. यात काही अधिकारी व कर्मचारीच आहेत. व अशा लोकांपासून दूर राहिली पाहिजे असे नगरसेवक अंजूम शेख म्हणाले.

ठेकेदाराने सर्वसाधारण सभेत ठेका परवडत असल्याचे सांगितले होेते. परंतु नगराध्यक्षा यांनी ज्योतिष शास्त्राची पदवी घेतली आहे? त्यांनी मागील सभेतच ठेकेदाराला ठेका परवडणार नसल्याचे सांगितले होते. त्यांना अगोदरच कळाले होते. असा आरोप उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी करताच त्यावर नगराध्यक्षा म्हणाल्या, माझ्याविरुध्द कोणतेही आरोप करु नका. मी सहन करणार नाही. नाहीतर मला गुन्हा दाखल करावा लागेल. मी कामगारांच्या हितासाठी बोलत होते. शहराच्या स्वच्छतेचा आणि गावातील नागरिकांच्या हितासाठीच मी काम करत आले आहे. त्यामुळे माझ्याविरुध्द काहीही आरोप करु नका.

- Advertisment -

ताज्या बातम्या