Friday, April 26, 2024
HomeUncategorizedग्रंथ वाचनामुळे समाज ज्ञानसंपन्न होतो-ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ

ग्रंथ वाचनामुळे समाज ज्ञानसंपन्न होतो-ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ

औरंगाबाद – aurangabad

वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात व वैचारिक दृष्टिकोन बदलतो. सामाजिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचन आवश्यक असून ग्रंथ वाचनामुळे समाज ज्ञानसंपन्न होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ यांनी केले.

- Advertisement -

ग्रंथोत्सव 2022 उपक्रमांतर्गत उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, ज्येष्ठ पत्रकार अण्णा वैद्य, ग्रंथालय सहायक संचालक सुनील हुसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक गुलाबराव मगर, कैलास पब्लिकेशनचे कुंडलिक अतकरे, माहिती अधिकारी मीरा ढास यांच्यासह विविध शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिक उपस्थित होते.

वाचकांची संख्या वाढविण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे साहित्यिक उपक्रम महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. समाज माध्यमांच्या व माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामूळे समाजातील वाचनक्षमता कमी झालेली दिसून येते. त्याचप्रमाणे मराठी लेखकांचे लेखन हे पुस्तक स्वरुपात प्रकाशित न होता, समाजमाध्यमातून प्रकाशित झाल्याने पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या कमी झाल्याची खंत श्री. रसाळ यांनी व्यक्त केली. विज्ञान तंत्रज्ञानाच्याबाबतीत अधिक साहत्य निर्मिती न झाल्याने ज्ञान क्षेत्रात योगदान देणारे मराठी साहित्य पाहिजे तेवढ्या प्रमाणात प्रकाशित झाले नाही. येथून पुढे बदललेल्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी लेखकांनी मराठी भाषा ही ज्ञान भाषा व्हावी म्हणून विज्ञान- तंत्रज्ञानाच्या आधारावर मराठी साहित्य निर्माण करावे, अशी अपेक्षा मराठी साहित्याचे समिक्षक रसाळ यांनी व्यक्त केली.

उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी ग्रंथोत्सव मोलाची भू‍मिका निभावतो. आपल्या व्यक्तीमत्व विकासात वाचनाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे कार्यक्रमात सांगितले.

दोन दिवसीय ग्रंथोत्सावाची सुरुवात क्रांती चौक येथून ग्रंथ दिंडीने झाली. ग्रंथ दिंडीच्या उद्घाटनास अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. ग्रंथ दिंडीमध्ये पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी ढोल, ताशा आणि लेझीम या वाद्यांसह सहभाग घेतला. या नादमयी वातावरणात ग्रंथ दिंडीची सांगता विभागीय ग्रंथालय आवारात करण्यात आली. ग्रंथ दिंडीमध्ये डॉ. देसरडा पब्लिक स्कूल, औरंगाबाद, श्री गजानन विद्यामंदिर, रांजणगाव (शें.पु.), बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल रांजणगाव, अलमीर सेकंडरी हायस्कूल, औरंगाबाद इत्यादी शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन

दोन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने शासकीय ग्रंथालय परिसरात ग्रंथप्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यीक सुधीर रसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथ प्रदर्शनात विविध प्रकाशकांनी ग्रंथसंपदा सवलतीच्या दरामध्ये वाचकांना विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन विभागीय ग्रंथालय, खोकडपूरा आणि जिल्हा ग्रंथालय कार्यालय यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

26 नोव्हेंबर संविधान दिन असल्याने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन कार्यक्रमात करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या