Wednesday, April 24, 2024
Homeनगरग्रामीण रुग्णालयाने उपचार करण्यास विलंब केल्यामुळे सर्पदंश झालेल्या आदिवासी मुलीचा मृत्यू

ग्रामीण रुग्णालयाने उपचार करण्यास विलंब केल्यामुळे सर्पदंश झालेल्या आदिवासी मुलीचा मृत्यू

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

सर्पदंश झालेल्या सोळा वर्षीय आदिवासी मुलीला नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात वेळीच उपचार न मिळाल्यामुळे तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी आदिवासी प्रबोधन सेवा संघ प्रणित तंट्या ब्रिगेडच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

निवेदनात म्हटले की, अश्विनी लहू बर्डे (वय 16) रा. नागझिरी (नेवासा) या आदिवासी समाजाच्या युवतीला सर्पदंश झाल्यामुळे शनिवार (दि. 18) रोजी रात्री नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र या रुग्णालयातील आरोग्य सेवकांनी उपचार करण्यास विलंब व टाळाटाळ केल्यामुळे मयत अश्विनीवर उपचार करण्यासाठी येथील रुग्णालयातून 108 रुग्णवाहिकाही जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी मिळालेली नव्हती.

खासगी रुग्णवाहिकेतून सर्पदंश झालेल्या युवतीला जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी विलंब झाल्यामुळे तीला जीव गमवावा लागला. या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदन देताना आदिवासी प्रबोधन सेवा संघ प्रणित तंट्या ब्रिगेडचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भंगाड, चर्मकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश शेंडे, क्रांतिकारी यशवंत नाईक संघटनेचे रणजित माळी, सोमनाथ माळी, गणेश पवार, जयराम पवार, सुभाष बर्डे, सुरेश गांगुर्डे आदी उपस्थित होते.

सर्पदंश झालेल्या मुलीला जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी नेवासा फाटा येथील रुग्णालयासमोर 108 रुग्णवाहिका उभी होती मी 108 ला कॉल केला असता पाच मिनिटांत गाडीकडून आपणास कॉल येईल असे सांगितले मात्र एक तास वाट पाहूनही 108 रुग्णवाहिका मिळाली नाही. पदरमोड करून खासगी रुग्णवाहिकेने रुग्णाला वेळेत नेता न आल्यामुळेच या युवतीचा मृत्यू झाला असल्याचे सुरेश शेंडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या