Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्या‘स्मार्ट नाशिक’चे पाचव्या वर्षात पदार्पण

‘स्मार्ट नाशिक’चे पाचव्या वर्षात पदार्पण

नाशिक । प्रतिनिधी

मंत्रनगरी ते तंत्रनगरी असा नाशिकचा प्रवास आता मेट्रो सिटी तथा महानगरीच्या दिशेने सुरू आहे. राज्यात पाचव्या क्रमांकाचे शहर म्हणून नाशिकचा लौकिक जागतिक स्तरावर पोहोचला आहे. पुढच्या पंचवीस वर्षांत नाशिक शहर हे अमेरिकेतील बोस्टन शहराच्या धर्तीवर विकसित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.

- Advertisement -

शहराची केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात निवड होऊन चार वर्षे नुकतीच पूर्ण झाली असून आज (दि.1) पाचव्या वर्षात पदार्पण होत आहे. गेल्या चार वर्षांत 53 प्रकल्पांपैकी 21 प्रकल्प पूर्ण झाले असून 17 प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पांमुळे नजीकच्या काळात सुरक्षित, राहण्यायोग्य, परिपूर्ण पायाभूत सुविधांयुक्त शहर म्हणून नाशिकनगरीची नवी ओळख निर्माण होणार आहे.

अगोदर सिंगापूर नंतर बोस्टनच्या धर्तीवर नाशिकच्या विकासाची स्वप्ने नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी पाहिली आहेत. यानुसारच केंद्र शासनाच्या स्मार्ट अभियानाअंतर्गत देशातील शंभर स्मार्ट सिटी शहरांत दुसर्‍या टप्प्यात अर्थात सन 2016 मध्ये निवड झाली आहे. देशात या शंभर शहरांना अत्याधुनिक शहरांत रूपांतरीत करण्यासाठी सुरू झालेल्या अभियानात नाशिक स्मार्ट सिटी कंपनीकडून शहरासाठी 54 प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. राज्याचे अपर सचिव तथा नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या प्रयत्नांनी स्मार्ट सिटीची कामे विविध अडथळे पार करत यशस्वीपणे वाटचाल करत आहे.

आंतरराष्ट्रीय मानकांनुसार शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत 17 कोटी खर्च करून पहिला पायलट रोड तयार झाला आहे. अत्याधुनिक शहरात सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते. याच धर्तीवर स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात 800 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून यापैकी सीबीएस व मेहेर सिग्नल या भागात कॅमरे बसवण्यात आले आहेत. उर्वरित भागात केबल टाकण्याचे काम सुरू आहे.

नाशिक महापालिका व शहर पोलीस आयुक्तालय यांच्या संंयुक्त विद्यमाने स्मार्ट सिटीअंतर्गत महाआयटी यांच्याकडून सीसीटीव्ही व कॅमेरे व कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रुम पूर्ण झाले आहे. या कंट्रोल रुमची 4000 सीसीटीव्ही कॅमरे जोडण्याची क्षमता आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांतून शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबर गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.

या माध्यमातून शहराला सुरक्षितता निर्माण होणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने ऊर्जा बचतीचे धोरण लागू केल्यामुळे शासन निर्देशानुसार पथदिव्यांमध्ये वीज बचतीच्या पद्धतीच्या अवलंब सुरू झाला असून यानुसार आता महापालिका प्रशासनाकडून संपूर्ण शहरात स्मार्ट लाईट बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहरातील पाण्याची गळती कमी करण्यासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात स्काडा व एएमआर जलमापकांसाठी तरतूद करण्यात आली आहे. शहरातील सर्व नळजोडण्यांना एएमआर सुविधेसह जलमापके बसवण्यात येणार आहेत.

गावठाण भागातील रस्ते विकास आणि पाणीपुरवठा पाईपलाईन नूतनीकरणाचे काम सुरू झाले आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत ग्राहकांना 24 बाय 7 पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच गोदा प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील कामास प्रारंभ झाला आहे. अशाप्रकारे शहराला स्मार्ट सिटीचे रूप गेल्या चार वर्षांत मिळाले आहे. अशाप्रकारे नाशिककरांच्या विकासाची सकारात्मक वाटचाल पुढील नवीन वर्षात सुरू राहणार आहे.

नाशिक स्मार्ट सिटीच्या कामांची प्रगती

53 प्रकल्पांची किंमत- 4384.72 कोटी रु.

22 प्रकल्प पूर्ण किंमत- 452.69 कोटी रु.

19 प्रकल्पांची कार्यादेश किंमत- 2297.45 कोटी रु.

5 प्रकल्प निविदा प्रक्रियेत किंमत- 975.97 कोटी रु.

7 प्रकल्प डीपीआरअंतर्गत किंमत- 676.61 कोटी रु.

- Advertisment -

ताज्या बातम्या