कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांना सहा महिने मुदतवाढ

नाशिक l प्रतिनिधी Nashik

नाशिक,पिंपळगाव बसवंतसह जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील संचालक मंडळास पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.याचा जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांना फायदा होणार आहे. साधारणत: पाच महिन्यांचा वाढीव कार्यकाळ या बाजार समित्यांना मिळणार आहे.

राज्याच्या कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) विभागाने १० जुलै रोजी याविषयी अध्यादेश जाहीर केला आहे. त्यानुसार, साधारणत: मार्च ते जुलैपर्यंत कार्यकाळ संपुष्टात येणार्‍या कृषी उत्पन्न बाजार समित्यांना येत्या २४ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. करोनाच्या पहिल्या टप्प्यात दिलेली ही मुदतवाढही संपण्यावर आली तरी, करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर पणन विभागाने आता बाजार समित्यांना पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

जिल्ह्यातील नांदगाव, कळवण, येवला, देवळा, चांदवड, पिंपळगाव बसवंत, सिन्नर व नाशिक बाजार समित्यांना याचा लाभ होणार आहे. या बाजार समित्यांची निवडणूक नवीन नियमांनुसार घेण्याचे आदेश भाजप सरकारने दिले होते. या आदेशानुसार बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला होता. परंतु, महाविकास आघाडी सरकारने हा आदेश रद्द करुन पूर्वीप्रमाणेच निवडणूका घेण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार बाजार समित्यांमध्ये आता निवडणुकांचा फड रंगला असता.परंतु , करोनामुळे सर्वच निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. यात नाशिकसह पिंपळगाव बसवंत या दोन महत्वाच्या बाजार बाजार समित्यांची मुदत ऑगस्ट २०२० मध्ये संपुष्टात येणार आहे. तसेच नांदगाव, कळवण, येवला, चांदवड, सिन्नर या बाजार समित्यांचिही मुदत ऑगष्टमध्ये संपणार असल्याने येथील संचालकांनाही या निर्णयाचा दिलासा मिळाला आहे.

…सभापतींची मात्र डोकेदुखी वाढली

बाजार समित्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळालेली असली तरी विद्यमान सभापतींची डोकेदुखी वाढली आहे. आवर्तन पध्दतीनुसार बहुतेक सभापतींचा कार्यकाळ संपलेला असताना आता वाढीव कार्यकाळात आम्हाला संधी द्यावी, म्हणून त्यांनी आग्रह धरला आहे. त्यामुळे वाढीव कार्यकाळात सभापती बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बाजार समित्यांचा कार्यकाळ

– नाशिक: २०/८/१५ ते १९/८/२०

– नांदगाव: २०/८/१५ ते १९/८/२०

-कळवण: २९/८/१५ ते २८/८/२०

– येवला: २०/८/१५ ते १९/८/२०

– देवळा: १२/२/१४ ते ११/२/१९

– चांदवड: १७/८/१५ ते १६/८/२०

– पिंपळगाव ब.:०३/८/१५ ते २/८/२०

– सिन्नर: २१/८/१५ ते २०/८/२०


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *