Saturday, April 27, 2024
Homeनगरशिर्डी निवडणुकीचा बिगूल वाजला

शिर्डी निवडणुकीचा बिगूल वाजला

शिर्डी (शहर प्रतिनिधी)

यावर्षी डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या १७ व मुदत समाप्त झालेल्या २ आणि नवनिर्मित ७ अशा राज्यातील एकूण २६ नगरपंचायतींसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी नगरपंचायतीची प्रभाग रचना आरक्षण तसेच सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता शिर्डी नगरपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजला असून आता खऱ्या अर्थाने आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी होणारी राजकीय रणधुमाळी रंगली जाणार आहे.

- Advertisement -

दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या दि. ९ नोव्हेंबर रोजी निघालेल्या परिपत्रकानुसार २६ नगरपंचायत मधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार प्रभाग रचनेचे तीन मुख्य टप्पे राहणार आहेत. आरक्षणासह प्रारूप प्रभाग रचना करणे, हरकती व सूचनांवरील सुनावणी घेणे, व अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणे प्रभाग रचना करताना गुगल मॅप वापरून त्यावर प्रगणक गट दर्शवण्यात यावेत तसेच मुख्याधिकारी यांनी अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणासह प्रारुप प्रभाग रचना प्रस्ताव तयार करावा.

राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार या कार्यक्रमाचा टप्पा पुढील प्रमाणे असून संबंधित नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे बुधवार दि. १० नोव्हेंबरपर्यंत प्रारुप प्रभाग रचना आरक्षणासह प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव, नगरपंचायतीच्या प्रभागांची संख्या त्यांची प्रभाग ने एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातींची २०११ च्या जनगणने नुसार असलेली लोकसंख्या, क्षेत्र सीमांकन नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण यासह प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करतील. त्यानंतर गुरुवार दि. ११ नोव्हेंबरपर्यंत सदरच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी मान्यता देतील.

गुरुवार दि. ११ नोव्हेंबर रोजी सदस्य पदांच्या आरक्षणाच्या सोडती करिता जिल्हाधिकारी व नगरपंचायतीच्या वेबसाईटवर नोटीस प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर शुक्रवार दि. १२ नोव्हेंबर रोजी नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या आरक्षणाच्या सोडत काढणे, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील महिला नागरीकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढली जाईल. त्यानंतर शुक्रवार दि. १२ नोव्हेंबर रोजी हरकती व सूचना तसेच सुनावणी संदर्भात जिल्हाधिकारी कारवाई करतील.

प्रारुप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे व सदस्य पदांच्या आरक्षणाची (अधिसूचना सूचना कलम १० नुसार ) रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागवणेकरिता वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व या नगरपंचायतीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. शुक्रवार दि १२ नोव्हेंबर ते मंगळवार दि.१६ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी आहे. त्यानंतर बुधवार दि. १७ नोव्हेंबर पर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचना यावर सुनावणी होईल.

गुरुवार दि. १८ नोव्हेंबर रोजी पर्यंत हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन त्या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी हे संबंधित विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे पाठवणार आहेत. त्यानंतर सोमवार दि. २२ नोव्हेंबर रोजी संबंधित विभागीय आयुक्त अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देतील. अंतिम प्रभाग रचना प्रभाग निहाय एकूण लोकसंख्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींची लोकसंख्या तसेच आरक्षणासह मंगळवार दि. २३ नोव्हेंबर पर्यंत अधिनियमातील कलम १० नुसार अंतिम अधिसूचना वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचायतीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल. असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. नगरपंचायतमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी नगरपंचायतीचा सामावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या