Saturday, April 27, 2024
Homeजळगावउपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार

जळगाव । Jalgaon

महापालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर चारचाकीतून पाठलाग करत सहा ते सात जणांनी गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पिंप्राळा येथील मयूर कॉलनी येथे घडली. संशयित पाठलाग करत कुलभूषण पाटील यांच्या घरी आले व या ठिकाणी त्यांनी तीनवेळा फायर केले. सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही.

- Advertisement -

वाद मिटवण्याचा राग

पिंप्राळा परिसरातील एका मैदानावर क्रिकेट खेळण्यावरून मुलांमध्ये रविवारी दुपारी 2 वाजता वाद झाला. याबाबतची माहिती मिळाल्यावर उपमहापौर कुलभूषण पाटील घटनास्थळी पोहोचले. हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र तक्रारही देण्यात आली. हा वाद मिटविण्यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील आल्याने त्याबाबतचा राग भांडण करणार्‍या एका गटात होता. रात्री आठ वाजेच्या सुमारास कुलभूषण पाटील हे त्यांचे पिंप्राळा येथील सोमाणी मार्केटमधील कार्यालयात होते. यावेळी चारचाकीतून काही संशयित आले. त्यांनी कार्यालयावर गोळीबार केला. भितीने कुलभूषण पाटील दुचाकीने घराकडे निघाले. संशयितांनी कारने घरापर्यंत त्यांचा पाठलाग केला.

तीनवेळा केले फायर

दुचाकीवरून उतरताच कुलभूषण पाटील यांनी घराबाहेर बसलेल्या त्यांच्या कुटूंबियांना घरात जाण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर स्वतः कुलभूषण पाटील हे घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेकडे पळाले. संशयितांनी कार घरासमोर उभी केली त्यातून तीन ते चार जण उतरले.

कुलभुषण पाटील यांच्या दिशेने एक वेळा तसेच त्यांचे वरच्या घरात असलेल्या चिमुकल्यांच्या दिशेने दुसरा तर हवेत तिसरा अशा पध्दतीन 3 वेळा गोळीबार केला. याठिकाणी संशयितांनी अश्लील शिवीगाळही केली. पाच मिनिटे संशयित याठिकाणी थांबले. व चारचाकीतून निघून गेले. दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गोळीबार झाल्याची वार्ता वार्‍यासारखी पसरल्याने कुलभूषण पाटील यांच्या घराजवळ मोठ्या संख्येने गर्दी जमली होती.

पोलीस अधीक्षकांनी दिली घटनास्थळी भेट

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळ गाठून माहिती घेतली. कुलभुषण पाटील यांच्या घराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित कैद झाल्याची माहिती मिळाली असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या