शिर्डी परिक्रमा आयोजकांवर गुन्हा

शिर्डी परिक्रमा आयोजकांवर गुन्हा

शिर्डी (प्रतिनिधी)- शिर्डी परिक्रमा आयोजकांनी परिक्रमा पूर्ण करत प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले. यावरून महोत्सवाचे आयोजक जितेंद्र शेळके, अजित संपतलाल पारीख व महोत्सव कमिटी यांच्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना जिल्हा प्रशासनाने पुढील आदेश होईतोपर्यंत स्थगिती दिली आहे.
रविवारी शिर्डीत होणार्‍या शिर्डी परिक्रमा महोत्सवाच्या आयोजकांनाही बैठक बोलावून साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू झाल्याची माहिती देऊन नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेता शिर्डी परिक्रमा महोत्सव  कार्यक्रम संस्थगित करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार प्रांताधिकार्‍यांनी दिल्या होत्या. मात्र या आदेशाचा भंग करत शिर्डी परिक्रमा आयोजकांनी परिक्रमा पूर्ण करत आदेशाचे उल्लंघन केले. यावरुन महोत्सवाचे आयोजक जितेंद्र शेळके, अजित संपतलाल पारीख व महोत्सव कमिटी यांच्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी शिर्डी परिक्रमा महोत्सवाचे आयोजक डॉ. जितेंद्र शेळके, अजित पारख व कमिटीच्या सदस्यांना बोलावून घेत जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार साथ रोख प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्चपासून लागू झाल्याची माहिती दिली. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुभाव अनुषंगाने महोत्सवाला गर्दी होणार असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन आरोग्य धोक्यात येणार असल्याने मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 (1) तरतुदीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश पारीत करुन त्याची एक प्रत शिर्डी परिक्रमा समितीच्या सदस्यांना दिली.

सदर आदेश निर्गमित केलेले असतानाही दि. 15 मार्च रोजी सकाळी 6.30 ते 12 या वेळेत शिर्डी परिक्रमा महोत्सवाचे आयोजक डॉ. जितेंद्र शेळके, अजित पारख व महोत्सव कमिटी यांनी खंडोबा मंदिर येथून सन अ‍ॅण्ड सॅण्ड, शेळके वस्ती, बिरोबा मंदिर, साकुरी शिव, गोशाळा मार्गे खंडोबा मंदिर अशी पायी परिक्रम गर्दी जमवून केली. परिक्रमा रद्द झाल्याबाबत प्रशासनास खोटी माहिती देऊन परिक्रम संपन्न केली. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर व उपविभागीय दंडाधिकारी शिर्डी यांच्याकडील लेखी आदेशाची अवहेलना केली म्हणून भारतीय दंड संहिता 1860 (45) यांच्या कलम 188, 177 नुसार अपराध केला. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून शिर्डी परिक्रमा महोत्सवाचे आयोजक जितेंद्र शेळके, अजित पारख व महोत्सव कमिटी यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com