Wednesday, April 24, 2024
Homeनगरशेवगाव तालुक्यात धुवाधार पाऊस

शेवगाव तालुक्यात धुवाधार पाऊस

शेवगाव|तालुका प्रतिनिधी|Shevgav

तालुक्याच्या पश्चिम भागात लागोपाठ सुरू असलेल्या पावसामुळे शेती जलमय झाली असून पिके, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. ढोरा नदीसह ओढे, नाले खळखळून वाहू लागले आहेत. कालच्या पावसाने खरिपाच्या तूर, कापूस, बाजरी, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

तालुक्यातील आव्हाणे, अमरापूर, वाघोली, ढोरजळगाव, भातकुडगाव, सामनगाव या परिसरातील गावांमध्ये दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने शेतातील सखल भागात पाणी साचल्याने खरिपातील बाजरी, तूर, मूग, कपाशी, सोयाबीन ही पिके पाण्याखाली गेली आहेत. लागोपाठच्या पावसामुळे वापसा होत नसल्याने शेतातील खुरपणी, खत घालणे, कोळपणी यासारखी कामे खोळंबली असून पिकांची वाढ खुंटली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्याने पिके पिवळी पडून त्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

गुरुवारी (दि. 23) रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे डोमेश्वर नाला, सकुळा, अवनी, नंदिनी व ढोरा नद्या वाहत्या झाल्या. वाघोली परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे माका, शिंगवे, दातीरवस्ती कडे जाणारे रस्ते वाहून गेले असून ते दुरुस्त करण्याची व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी युवा नेते उमेश भालसिंग, सरपंच बाबासाहेब गाडगे, दादासाहेब जगदाळे, सुभाष दातीर, किशोर शेळके, सोपान पवार, योगेश भालसिंग, बाळासाहेब भालसिंग, संदीप शेळके, अशोक ढाणे यांनी केली आहे.

तालुक्यात काल रात्री मंडलनिहाय झालेला पाऊस (मिलीमीटर मध्ये)-(कंसात आतापर्यंतचा पाऊस) शेवगाव- 76 (456), ढोरजळगाव-51 (371), भातकुडगाव-57 (404), एरंडगाव-25(211), चापडगाव-36(324) बोधेगाव-31 (273).

ढोरा नदीला पूर आल्याने ढोरजळगाव, सामनगाव, लोळेगाव येथील कोल्हापूर टाईप बंधार्‍यात गेल्या वर्षी टाकलेल्या फळ्या अद्यापही काढल्या नसल्याने आजूबाजूच्या शेतात नदीचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. तर हनुमानवस्ती, मळेगाव, सारपेवस्ती, आखतवाडे, लोळेगावकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने त्या गावांचा संपर्क तुटला.

- Advertisment -

ताज्या बातम्या