Wednesday, April 24, 2024
Homeनगरशरणपूर वृद्धाश्रम जागा, अनुदानाचा प्रश्‍न सोडवू - ना. कडू

शरणपूर वृद्धाश्रम जागा, अनुदानाचा प्रश्‍न सोडवू – ना. कडू

नेवासा फाटा (प्रतिनिधी) –

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नगरहून औरंगाबादकडे जाताना नेवासा फाटा येथील शरणपूर वृद्धाश्रमाला रात्रीच्या सुमारास भेट दिली. शासनाच्या मदतीशिवाय वृद्धाश्रम सुरू असल्याबद्दल त्यांनी कौतुक करत शरणपूर वृद्धाश्रमाच्या जागेचा व अनुदानाचा प्रश्‍न आपण स्वत: लक्ष घालवून सोडवू अशी ग्वाही दिली तर वृद्धांमुळे घर परिवार टिकत असल्याने त्यांना जपा असे आवाहन त्यांनी केले.

- Advertisement -

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी एप्रिल महिन्यापासून त्यांच्या सर्व सहकार्‍यांच्या मदतीने अनाथ वृद्धांना रोज मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था केली आहे आणि लॉकडाऊन संपेपर्यंत मिष्ठान्न भोजन पुरवणार्‍या उपक्रमाचे नामदार कडू यांनी कौतुक केले.

वृद्धांच्या समस्या जाणून घेताना तहसीलदार रुपेश सुराणा यांना त्यांनी फोन लावला व सर्व अनाथ वृद्धांचे रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड काढून श्रावण बाळ योजनेअंतर्गत सहाशे रुपये महिना व रेशन देण्याची व्यवस्था करावी असे आदेशही दिले. वृद्धाश्रमाचे चालक रावसाहेब मगर कुठल्याही शासनाच्या मदतीशिवाय हा वृद्धाश्रम चालवतात त्यांच्या कार्याचे कौतुक करत शासनदरबारी वृद्धाश्रमाला मान्यता देऊन पाटबंधारे खात्याच्या इमारतीमध्ये गरज पडल्यास जमीन देण्याचेही आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी शरणपूर वृद्धाश्रमाला रोख दहा हजार रुपयांची मदत नामदार बच्चू कडू यांनी केली.

नामदार बच्चू कडू म्हणाले की, मी वृक्ष पहायला आलो होतो पण वृद्ध भेटले. जसे वृक्षाची जपवणूक करून त्याची काळजी घेणे हे राष्ट्र कार्यासारखी गोष्ट आहे तसेच वृद्धांना जपले तर परिवारही एकसंघ राहतो. यासाठी प्रत्येकाने वृद्धांना जपण्याचे काम करावे असे आवाहन केले. शरणपूर वृद्धाश्रमाला चालविण्यासाठी मगर व त्यांचे कुटुंब सर्व संचालक आणि माझे प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी काळजी घेत आहेत याचा मला खूप अभिमान वाटतो असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी वृद्धाश्रम कमिटीचे मार्गदर्शक पत्रकार बाळासाहेब देवखिळे, सुरेशराव उभेदळ, भिवाजीराव आघाव, प्रहार वारकरी संघटनेचे अजय महाराज बारस्कर, राज्य उपाध्यक्ष संतोष पवार, जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे, रघुनाथदादा शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष रुपेंद्र काले, जिल्हा सल्लागार मेजर महादेव आव्हाड, संजय वाघ,कृष्णा सातपुते, बाळासाहेब खर्जुले, ज्ञानेश्‍वर सांगळे, नवनाथ कडू, अनिल विधाटे, महारुद्र आव्हाड उपस्थित होते. रावसाहेब मगर यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या