1 मार्चपासून नगर जिल्ह्यातील शाळा बंद?

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी) –

स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार 1 मार्चपासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात येत असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. नगरमध्येही करोनाची आकडेवारी वाढते आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

राज्यातील शाळा नोव्हेंबरमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुरुवातीला इयत्ता नववी ते बारावी

आणि दुसर्‍या टप्प्यामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा राज्यभरात प्रत्यक्षात सुरू करण्यात आल्या होत्या.

आता फेब्रुवारी महिन्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आणि विद्यार्थ्यांना होणारी करोनाची बाधा पाहता स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून एक मार्चपासून शाळा काही काळासाठी बंद ठेवण्यासाठीचा निर्णय घ्यायचा असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सोलापूर, सातारा, वाशिम जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर शाळा बंदबाबतच्या निर्णयाचा चेंडू स्थानिक प्रशासनाकडे टोलविण्यात आला आहे.

राज्यात काही जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता समाजकल्याण मंत्री व आदिवासी मंत्री व कल्याण विभाग यांच्याशी चर्चा शिक्षणमंत्री करत असून याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील 16 शाळांमधील 35, वाशिमच्या रिसोड तालुक्यातील आदिवासी हॉस्टेलमधील 229 विद्यार्थी आणि कर्मचारी तसेच सोलापुरातही 43 शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जिल्हावार माहिती संकलीत करण्यास सुरूवात केली आहे. मात्र स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा अशी सूचना मंत्री गायकवाड यांनी केली आहे.

विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या शाळांमध्ये करोना प्रादुर्भाव आढळून आला आहे, तिथे आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *