सायखेडा बसस्थानक जुगार-मटक्याचा अड्डा

निफाड । प्रतिनिधी | Niphad

गोदाकाठची प्रमुख बाजारपेठ असलेल्या सायखेडा (Saykheda) येथे परिवहन महामंडळाने (Transport Corporation) मोठ्या दिमाखात बसस्थानकाची (bus stand) उभारणी केली. परंतु हे बसस्थानक आता जुगार (Gambling)- मटका खेळणार्‍यांसह मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनले असून खासगी वाहनांचे वाहनतळ (parking) झाले आहे.

करोना (corona) काळापासून गोदाकाठला येणार्‍या बसगाड्यांची संख्या कमालीची घटली असून, गोदाकाठच्या खेडेगावात बसचे दर्शन दुर्लभ झाले आहे. त्यामुळे नाशिकसह (nashik) लासलगाव (lasalgaon) आगाराने नाशिक, सायखेडा (saykheda), शिंगवे (shingve), नांदूरमध्यमेश्वर (Nandur Madhyameshwar) ही शहर बससेवा (bus service) सुरू करून शालेय विद्यार्थी (students) व प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

सायखेडा हे गोदाकाठ परिसरातील शेतमाल विक्रीचे प्रमुख केंद्र असून व्यापारी बाजारपेठ म्हणून अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. शाळा, महाविद्यालये, दवाखाने, बँका, पतसंस्था, बाजार, खते, औषधे आदी कामांसाठी परिसरातील असंख्य गावातील नागरिकांचा सायखेड्याशी नित्याचा संपर्क येतो.

मात्र करोना काळापासून खासगी प्रवासी वाहतुकीबरोबरच परिवहन महामंंडळाच्या (Transport Corporation) बसगाड्याही बंद झाल्याने त्याचा विपरित परिणाम सायखेडा बाजारपेठेवर होवून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

करोना काळापासून सायखेडा बाजारपेठेतील आर्थिक व्यवहार देखील मंदावले आहे. करोना (corona) प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर नाशिक आगाराची नाशिक-सायखेडा ही सिटी बस (City bus) सुरू झाली असली तरी गोदाकाठच्या ग्रामीण भागामध्ये बसचे दर्शन अद्यापपर्यंत झालेले नाही. प्रवाशांचा विचार करता बस आगाराने सायखेडा येथेे लाखो रुपये खर्च करून बसस्थानकाची उभारणी केली. मात्र, हेच बसस्थानक आता जुगार, मटका खेळणार्‍यांचा अड्डा बनला असून मोकाट जनावरांंचे वास्तव्य येथे नित्याचे बनले आहे.

या स्थानकातून सायखेडा ते भेंडाळी तसेच सायखेडा ते करंजी, ब्राम्हणवाडे या बसगाड्यांबरोबरच पिंपंळगाव, ओझर, चांदोरी, सायखेडा, भेंडाळी, हिवरगाव, वडांगळी, वावी, शिर्डी ही बससेवा सुरू करावी. तसेच नाशिक, सायखेडा, नांदूरमध्यमेश्वर, निफाड, नाशिक अशी बससेवा नव्याने सुरू करावी. याबरोबरच पिंपळगाव, निफाड, शिवरे फाटा, नांदूरमध्यमेश्वर, खेडलेझुंगे या मार्गावर देखील बससेवा सुरू होणे गरजेचे आहे.

गोदाकाठ परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी सायखेडा, नाशिक येथे दररोज ये-जा करतात. परंतु गोदाकाठच्या अनेक गावातील विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी बससेवा नसल्याने त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे परिवहन महामंडळाने वरील मार्गावर बससेवा सुरू करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी परिसरातून होत आहे.

बसगाड्या सुरू करा; अन्यथा आंदोलन गोदाकाठ परिसरातून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात नाशिकला ये-जा करतात. तसेच खेडेगावातून शेतकरी, विद्यार्थी, चाकरमाने यांचा सायखेड्याला नित्याचा राबता असतो. त्यामुळे नाशिक मनपाने नाशिक-सायखेडा या शहर बससेवेबरोबरच सायखेडा ते हिवरगाव, नाशिक ते नांदूरमध्यमेश्वर, सायखेडा ते म्हाळसाकोरे, सायखेडा ते भेंडाळी, नाशिक ते सायखेडा, नांदूरमध्यमेश्वर, खेडलेझुंगे तसेच सायखेडा ते करंजी अशी बससेवा सुरू करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अन्यथा त्याबाबत आंदोलन छेडण्यात येईल.

– अश्पाक शेख, ग्रा.पं. सदस्य (सायखेडा)