संघर्ष समितीतर्फे सत्याग्रह

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरातील सटाणारोड, कॅम्परोड, साठफुटीरोड, मोसमपुल ते मोतीबागनाका या रस्त्यांसह इतर प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: दुरावस्था झाली आहे. या रस्त्यांचे त्वरीत डांबरीकरण व्हावे. तसेच रस्ते विकासकामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईची व कामांची गुणवत्ता तपासणी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी आज मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे एक दिवशीय सत्याग्रह करण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर समितीचे प्रा. के.एन. अहिरे, निखील पवार व देवा पाटील या पदाधिकार्‍यांनी हा सत्याग्रह केला. कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांनी रस्त्याची प्रलंबित कामे गुणवत्ता व दर्जा राखून नोव्हेंबर अखेरपर्यंत पुर्ण केले जातील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

मनपा हद्दीतील सटाणा रोड, कॅम्प रोड, ६० फुटी रोडसह इतर काही प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. या रस्त्यांच्या विकासाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मात्र रस्त्याची कामे ठेकेदारांतर्फे करतांना प्रचंड दिरंगाई होत असून देखील त्यांच्यावर राजकीय दबावातून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

मात्र २४ तास वर्दळ असलेल्या या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे वाहतुकीस तसेच नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांच्या दचक्यामुळे पाठीचे आजार शहरात वाढले आहे. डिव्हायडरला सुरक्षा पट्टे कलर करण्यात आलेले नाहीत त्यामुळे डिव्हायडरवर रात्रीच्या अंधारात वाहने धडकून अपघाताच्या घटना घडत आहेत. काही रस्त्यांची कामे झाली मात्र ती गुणवत्तापुर्ण झालेली नाहीत.

मनपा हद्दीतील रस्त्यांच्या विकासासाठी शासनातर्फे कोट्यवधी रूपयांचा निधी दिला जातो. मात्र हा निधी पुर्ण खर्च केला जात नाही. रस्त्यांची कामे गुणवत्तापुर्ण केली जात नसल्याने खर्च केलेला निधी देखील वाया जात आहे. त्यामुळे प्रलंबित रस्त्यांची कामे तात्काळ पुर्ण व्हावीत तसेच गुणवत्ता नसलेल्या रस्त्यांच्या कामाची चौकशी होवून दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या पदाधिकार्‍यांनी केली.

करोना प्रादुर्भावामुळे कामे थांबविण्यात आली होती. तसेच सध्या सुरू असलेल्या पावसामुळे डांबरीकरणाच्या कामात अडचणी आहेत. मात्र रस्त्यांची सर्व मंजूर कामे दर्जा व गुणवत्ता राखून सर्वार्थाने नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येतील.

राहुल पाटील कार्यकारी अभियंता


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *