Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसप्तशृंगी गड : शौचालय बांधा अन्यथा शाळेला कुलूप ठोकणार; ग्रामस्थांचा संताप

सप्तशृंगी गड : शौचालय बांधा अन्यथा शाळेला कुलूप ठोकणार; ग्रामस्थांचा संताप

नाशिक : सप्तशृंगगड येथील परम पूज्य ओम दत्त श्री ठाकूर महाराज माध्यमिक विद्यालयात गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून शौचालय नसल्याने विद्यार्थ्यांना अक्षरक्ष: उघड्यावर शौचालयास जावे लागत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छता की और’असे म्हणत घरोघरी शौचालयाचा नारा दिला आहे, परंतु या शाळेत शौचालयाने नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या विद्यालयामध्ये 214 विद्यार्थी व वसतिगृहाचे ही विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहे. शाळेची दुपारीची सुट्टी झाली की मुलींनी लघुशंकेसाठी कुठेे जावे? असा प्रश्न त्यांना पडतो. येथे शौचालयाची सोय नसल्याने त्यांना नाईलाजाने शौचालयासाठी व लघुशंकेसाठी उघड्यावरच जावे लागते.शासन शौचालयाबाबत सर्वत्र जनजागृती करून गावागावात व तालुक्याच्या ठिकाणी भिंतीवर शौचालयाचे चित्र रेखाटून संदेश पोहचवताना दिसत आहे. शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांना उघड्यावर शौचालयास बसू नये अशा प्रकारचे शिक्षण देत आहे, परंतु ते सर्व फोल ठरत आहे.

- Advertisement -

येथे पाचवी ते दहावीपर्यंतचे व वसतिगृहाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेमध्ये भौतिक सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर शौचालयास जावे लागते ही लज्जास्पद बाब आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके यांनी प्रशासनाला जाब विचारला. विद्यालयातील विद्यार्थ्यांना शौचालयास बाहेर उघड्यावर जावे लागते तरी त्वरीत शौचालय बाधूंन मुला- मुलींची होणारी हेळसांड थांबवावी, असा अर्ज ग्रामस्थांच्या व पालकांच्या वतीने मुख्याध्यापकांना देण्यात आला होता, परंतु शौचालयाचे काम सुरू झाले, मात्र ते काही दिवसांतच अर्धवट स्थितीत बंद पडले.

गेल्या काही महिन्यांपासून शौचालयाचे काम बंद असल्याने या कामाबाबत बेनके यांनी या शाळेचे मुख्याध्यापक डी. एन. नवले यांना विचारपूस केली असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन आपल्या अंगावरचे घोगंडे झटकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे याबाबत वरिष्ठांनी लक्ष देवून शौचालय बांधण्यात यावे, अशी मागणी संतप्त पालक व ग्रामस्थांनी केली आहे.

आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी गोरगरीब कुटुंबातील असल्याने त्यांना अधिक चांगल्या प्रकारे सुविधा मिळणे अपेक्षित आहे. मात्र वसतिगृह असोत की आश्रमशाळा त्यांची अवस्था बिकट होऊनही त्याकडे वेळीच लक्ष दिले जात नाही. त्यामुळे गैरसोयींचा सामना करत विद्यार्थी शिक्षण घेत असतात.
-राजेश गवळी, उपसरपंच

- Advertisment -

ताज्या बातम्या