वाळूमाफियांची मुजोरी : तहसीलदारांवर हल्ला

jalgaon-digital
2 Min Read

साक्री – 

साक्री तालुक्यातील दातर्ती शिवारात पांझरा नदीच्या पात्रात अवैधपणे वाळू उपसा करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांसह पथकावर वाळु माफियांनी हल्ला चढवला. तहसलीदार चव्हाण के यांच्यासह पथकाला धक्काबुक्की करत डंपर अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहा जणांविरूध्द साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दातर्ती येथील पांझरा नदीच्या पात्रात दोन डंपर जेसीबीच्या सहाय्याने वाळु भरत असल्याची माहिती कोतवाल विजय मोरे यांनी तहसीलदार चव्हाण के यांना दिली.  त्यानुसार त्यांच्यासह कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय येथुन आपले काम आपटुन शासकीय वाहनाने  (क्रं.एमएच-18 एफ-106) काल दि. 26 रोजी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास दातर्ती शिवारात असलेल्या पुलाजवळ पांझरा नदी पात्रात पोहोचले.

टॉर्चच्या उजेडात पाहणी केली असता तेथे दोन डंपरमध्ये (क्रं.एमएच-12 एक्यु-2544) व  (क्र.एमएच-18 एए-1876)हे जेसीबीच्या सहाय्याने वाळ टाकतांना दिसून आले. पथकाला पाहुन डंपर चालक पळुन जावु लागले. तेव्हा पथकाने त्यांना शेवाळीकडे जाणार्‍या रस्त्यावर अडविले.

वाहन चालकांची चौकशी करत असतांना तेथे विना क्रमांकाच्या स्कारपिओमधुन दोन ते तीन इसम उतरले. त्यांनी तहसीलदार चव्हाण के यांच्यासह पथकाला  शिवीगाळ करत दमदाटी केली. तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत दोन्ही डंपर घेवुन पळुन जात असतांना डंपर अंगावर चालवून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला.

तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करून गौण खनिजाची चोरी करुन पर्यावरणाचा र्‍हास केला. याप्रकरणी तहसीलदार चव्हाण के यांनी साक्री पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जगदीश मनोहर  (पुर्ण नावगाव माहित नाही), अनिल मोरे  (पूर्ण नावगाव माहित नाही), प्रकाश  (पुर्ण नावगाव माहित नाही),  भुषण वाय  (पुर्ण नावगाव माहित नाही) व दोन इसम यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास  पोसई पी.एन.बनसोडे हे करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *