Friday, April 26, 2024
Homeनाशिकसमृद्धीच्या संतापलेल्या कामगारांचे काम बंद आंदोलन

समृद्धीच्या संतापलेल्या कामगारांचे काम बंद आंदोलन

वावी | Vavi

सिन्नर तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन या कंपनीने गेल्या तीन महिन्यांपासून कामगारांचे वेतन अदा न केल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी शुक्रवारी (दि.९) दिवसभर काम बंद आंदोलन पुकारले.

- Advertisement -

समृद्धी महामार्गाच्या सिन्नर तालुक्यातून जाणाऱ्या पॅकेज १२ चे काम दिलीप बिल्डकॉन कंपनीने घेतले असून त्यांचे वावी आणि गोंदे येथे दोन डेपो असून दोन्हीही ठिकाणी कामगारांनी वाहने रस्त्यावर उभी करून देत येथील कॅम्पच्या प्रवेशद्वारावर एकत्र येत कामगारांनी कंपनीच्या विरुद्ध एल्गार पुकारला व व्यवस्थापनाचा निषेध नोंदवला.

गेल्या तीन ते चार महिन्यापासून येथील कामगारांचा पगार होत नसल्याने कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला असून कंपनी व्यवस्थापनाकडे वारंवार मागणी करूनही पगार द्यायला टाळाटाळ होत आहे. सकाळपासून सुमारे २ हजार कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले.

मात्र व्यवस्थापनाचा एकही अधिकारी समोर न आल्याने कामगारांच्या संतापात भर पडली आहे. दरम्यान, यापूर्वी जेवणाच्या मोबदल्यात कामगारांच्या पगारातून १२०० रुपयांची केली जाणारी कपात वाढवून ती थेट ३३०० रुपये केल्याने कामगारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

कामगारांनी मांडल्या व्यथा

कंपनी व्यवस्थापनाकडून दिल्या जाणारा जेवणाचा दर्जा सुमार असल्याने बहुसंख्य कामगार स्वतःच्या हाताने जेवण बनवत आहेत.

तरीदेखील पगारात ३ हजार रुपयांची कपात केली जाते. आरोग्यविषयक सुविधा पुरवल्या जात नाही. मागील अनेक महिन्यांपासून आरोग्य तपासणी करण्यात आली नाही. आजारी कामगारांना उपचारासाठी आगाऊ रक्कमही मिळत नाही.

स्थानिक सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला जातो. परराज्यातून येऊन रात्रंदिवस काम करताना सुरक्षा राहिली नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. वेळेवर पगार मिळाला तर गरजा भागवता येतील अन्यथा उदरनिर्वाह चालवणे अवघड असल्याचे कामगारांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या