लाजिम है कि हम भी देखेंगे वो दिन…

लाजिम है कि हम भी देखेंगे वो दिन…

लाजिम है कि हम भी देखेंगे वो दिन…

विचारविश्‍वनाथ सचदेव

‘हम देखेंगे’ शीर्षकाची कविता सध्या वादाच्या भोवर्‍यात आहे. आयआयटी कानपूरमधील काही विद्यार्थ्यांनी नागरिकत्व कायद्याबाबत सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये ही प्रसिद्ध कविता गाऊन भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानच्या हुकूमशाहीविरुद्ध लिहिल्या गेलेल्या या कवितेत त्या शिक्षण संस्थेतील काही लोकांना ‘हिंदू विरोधा’चा दर्प आला. म्हणून या प्रकरणी एक समिती नेमण्यात आली. ही समिती या कवितेच्या औचित्यावर निर्णय देणार आहे.

गेल्या शतकातील सातव्या दशकाअखेर किंवा कदाचित आठव्या दशकाच्या प्रारंभीची ही घटना असेल. पाकिस्तान आणि भारताचे आवडते शायर फैज अहमद फैज एका मुशायर्‍यात भाग घ्यायला मुंबईत आले होते. ‘बोल कि लब आजाद है तेरे’ आणि ‘निसार मै तेरी गलियों पे, ऐ वतन कि जहां चली है रस्म, कि कोई न सर उठा के चले…’ यासारखी शायरी लिहिणार्‍या फैज साहेबांना ऐकायला आम्ही काही मित्र मुंबईच्या रंगभवनात पोहोचलो होतो. रात्री उशिरापर्यंत मुशायरा चालला. तोपर्यंत चर्चगेट स्थानकावरून रात्रीची शेवटची लोकलसुद्धा निघून गेली. ती रात्र आम्ही समुद्रकिनारी मरीन ड्राईव्हवर फैज साहेब यांच्या शायरीच्या ओळी गुणगुणत घालवली. फैज साहेबांचे नाव घेतल्यावर ती रात्र आपसूक आठवते. ‘मुझसे पहली-सी मुहब्बत मेरे मेहबूब न मांग’ यासारख्या कविता लिहिणार्‍या या कवीने ‘हम देखेंगे’सारख्या क्रांतिकारी कवितासुद्धा लिहिल्या होत्या.

आज हीच ‘हम देखेंगे’ शीर्षकाची कविता सध्या वादाच्या भोवर्‍यात आहे. आयआयटी कानपूरमधील काही विद्यार्थ्यांनी नागरिकत्व कायद्याबाबत सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये ही प्रसिद्ध कविता गाऊन भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानच्या हुकूमशाहीविरुद्ध लिहिल्या गेलेल्या या कवितेत त्या शिक्षण संस्थेतील काही लोकांना ‘हिंदू विरोधा’चा दर्प आला. म्हणून या प्रकरणी एक समिती नेमण्यात आली. ही समिती या जगप्रसिद्ध कवितेच्या औचित्यावर निर्णय देणार आहे. या कवितेतील कोणत्या शब्दांवर आक्षेप आहे हे जाणण्याआधी या कवितेची पार्श्‍वभूमी जाणून घेणे योग्य ठरेल. पाकिस्तानी हुकूमशहा जनरल झिया-उल-हकने फैज यांना त्यांच्या विचारांबद्दल तुरुंगात टाकले होते. ‘लाजिम है कि हम भी देखेंगे वो दिन जिसका वादा है| जो लौह-ए-अजल मे लिक्खा है| जब जुल्मों-सितम के कोहे गिरां| रूई की तरह उड जायेंगे…|’ अशा ओळी फैज यांनी तुरुंगातच लिहिल्या होत्या. पाकिस्तानच्या हुकूमशहाला ही कविता कशी आवडणार? या कवितेला मुस्लीमविरोधी ठरवून तिच्यावर बंदी आणली गेली. १९७९ मध्ये लिहिलेली ही कविता १९८६ मध्ये जगासमोर आली. १० फेब्रुवारीचा दिवस होता. फैज अहमद फैज यांच्या चाहत्यांनी त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘फैज मेळावा’ (फैज मेला) आयोजित केला होता. लाहोरच्या अल-हमरा आर्ट कौन्सिलमध्ये हा मेळावा झाला. पाकिस्तानची प्रसिद्ध गायिका इकबाल बानो व्यासपीठावर आली. ती काळ्या साडीत होती. ते पाहून श्रोत्यांना आश्‍चर्य वाटले. लष्करी हुकूमशहाने पाकिस्तानात साडीच्या पेहरावावर बंदी घातली होती. त्यामुळेच हा हिंदू स्त्रियांचा पेहराव मानला गेला होता. ‘लाजिम है कि हम भी देखेंगे…’ या शब्दांनी इकबाल बानोचा

आवाज घुमला तेव्हा कार्यक्रमात जणू वीजच चमकून गेली. टाळ्यांचा कडकडाट थांबता थांबत नव्हता. ‘सब ताज उछाले जायेंगे| सब तख्त गिराये जायेंगे| उठ्ठेगा अनल-हक का नारा… और राज करेगी खल्के खुदा| जो मै भी हूं और तुम भी हो…’ या ओळी इकबाल बानो यांनी समर्पक आवेशात गायल्या. हजारोच्या संख्येने श्रोते शायर आणि गायिका या दोघांना टाळ्यांनी साथ देत होते. खरे तर हा जनतेच्या मनातील विचार होता आणि आवाजसुद्धा! इकबाल बानोने गायलेले हे गीत लपून-छपून ध्वनिमुद्रित झाले होते. त्यानंतर विरोधाचे प्रतीक होऊन हे गीत सार्‍या जगात गाजले. आयआयटी कानपूरचे विद्यार्थी आणि नंतर जामिया मिलिया, दिल्लीतील विद्यार्थी-विद्यार्थिनी हुकूमशाही भूमिकेविरोधात याच प्रतीकातून आपले म्हणणे स्पष्ट करीत होते. पाकिस्तानातील लष्करी हुकूमशाहीला हे गीत सरकारविरोधी विद्रोह वाटला आणि भारतातील काही घटकांना आता त्यात हिंदूविरोध आढळला आहे. फैज नास्तिक होते आणि धर्मनिरपेक्षतेचा झेंडा मिरवणारेसुद्धा! ही गोष्ट जगाला ठाऊक आहे, पण कवितेतील ‘काबा’, ‘बुत’, ‘अल्लाह’ यांसारखे शब्द अशा घटकांना हिंदूविरोधी वाटत आहेत. ‘अब अर्ज-ए-खुदा के काबे से| सब बुत उठवाये जायेंगे| हम अहले-सफा मरदूत-ए-हरम मसनद पे बिठाये जायेंगे| जब पवित्र स्थानोसे हटाये गये हम जैसे लोगों को उंचे आसनोंपर बिठाया जायेंगा, जब ताज-तख्त मिट जायेंगे, सिर्फ ईश्‍वरका नाम रहेगा, हम देखेंगे’ असे या कवितेत म्हटले आहे.

या कवितेत हिंदू विरोध कुठे दिसतो? ‘बुतों’ शब्दाचा अर्थ मंदिरातील मूर्ती कसा झाला? ‘उट्ठेगा अनल-हक का नारा|’ अशी ओळ कवितेत येते. या ‘अहं ब्रह्मास्मि’च्या दर्शनावर हिंदूंचा विश्‍वास नाही? ‘अनल-हक’ म्हणजे ‘अहं ब्रह्मास्मि’ नव्हे तर वेगळे काय? कविता प्रतीकांमधून समजली-समजावली जाते. कवितेचा अर्थ केवळ शब्दांपुरताच मर्यादित नसतो. फैज अहमद फैजसारख्या कवींना केवळ शब्दार्थाने समजून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्यांना चूक ठरवण्याचा अट्टाहास करणे होय. फैज यांना सांप्रदायिकतेशी जोडण्याचा अट्टाहास पहिल्यांदाच होत नाही. काही वर्षांपूर्वी फैज लिखित ‘जागो हुआ सबेरा’ चित्रपटाला

भारतातील ‘मामी’ चित्रपट महोत्सवात विरोध झाला.

अज्ञानाचा अट्टाहासच तेव्हा वरचढ ठरला. २०१८ मध्ये दिल्लीत फैज यांची मुलगी मोनीजा हाशमीला ‘एशिया मीडिया समिट’मध्ये निमंत्रित करण्यात आले होते. मात्र तेथे तिला भाग घेऊ दिला गेला नाही. तेव्हा

सुद्धा फैज अथवा त्यांच्या मुलीचे पाकिस्तानी असणे विरोधकांना खटकले. हा चुकीच्या रंगाचा चष्मा आहे. दुसर्‍या धर्मांना रंगांच्या

आधारे ओळखायला शिकवणारा हा रंग धोकादायक आहे. कधीकाळी या रंगांना हिंदू-मुस्लिमांमध्ये विभागले गेले. आता शब्दांना हिंदू-मुस्लीम ठरवले जात आहे. ‘अल्लाह’ हा शब्द भारतीयांपैकीच काहींना मुस्लीम वाटू लागला आहे. ‘ईश्‍वर-अल्लाह

तेरो नाम’ शिकवणार्‍या महात्मा गांधींना आपणच राष्ट्रपिता आणि महात्मा म्हटले आहे ना? ईश्‍वर एकच आहे, असे बहुतेक हिंदू बोलतात आणि मानतात. या सगळ्याचा विसर का पडावा? ‘सब नाम रहेगा अल्लाह का जो गायब भी है, हाजिर भी’ असे म्हणतात तेव्हा फैज चुकीचे कसे वाटतात? ‘अनल हक’चा नारा देताना ‘जो मै भी हूं और तुम भी हो’ असे ते म्हणतात तेव्हा ‘अहं ब्रह्मास्मि’ का वाटत नाही? ‘राज करेगी खल्क-ए-खुदा’ असे फैज म्हणतात. हा त्यांचा लोकशाहीवरचा अटळ विश्‍वास व्यक्त होत नाही का? आपापल्या श्रद्धेवर आपलाच किती विश्‍वास आहे याचे उत्तर प्रत्येकाने आपापल्या मनात शोधावे.

विरोध हा लोकशाहीचा आत्मा आहे आणि ताकदसुद्धा! ज्या गोष्टीला जनता चूक मानते त्याला विरोध करण्याचा जनतेला अधिकार आहे. उचललेल्या पावलाचे औचित्य सिद्ध करणे हे निर्णय घेणार्‍यांचे कर्तव्यच आहे. लोकशाहीत तर्क आणि दाखल्यांच्या आधारे हे काम होते. केवळ दडपशाहीने नव्हे! फैज यांनी कवितेतून याच दडपशाहीचा विरोध केला होता. ‘खल्क-ए-खुदा’च्या शासनावर त्यांचा विश्‍वास होता. पाकमधील हुकूमशाहीच्या काळात ‘खल्क’च्या शासनावर विश्‍वास असल्याचे जाहीर करणे हे धाडसाचे काम होते. फैज यांनी ते धाडस दाखवले. लोकशाहीवर विश्‍वास ठेवणार्‍यांनी या धाडसाला सलामच केला पाहिजे. ‘सलाम’ शब्द आवडत नसेल त्यांनी त्याजागी ‘प्रणाम’ शब्द समजावा.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत आहेत.)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com