Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यारोहित पवारांचं आंदोलन : अजितदादांनी फटकारलं, उदय सामंतांच्या मध्यस्थीने निघाला तोडगा

रोहित पवारांचं आंदोलन : अजितदादांनी फटकारलं, उदय सामंतांच्या मध्यस्थीने निघाला तोडगा

मुंबई । Mumbai

राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. विरोधकांकडून दिवसाच्या सुरूवातीलाच विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. त्यानंतर कर्जत-जामखेड एमआयडीसीच्या प्रश्नी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. त्यानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रोहित पवारांची भेट घेतली. कर्जत-जामखेड एमआयडीसीचा मुद्दा विधानसभेत देखील गाजला. त्यावर अशा प्रकारचं आंदोलन करणं योग्य नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवारांना फटकारले.

- Advertisement -

सभागृहात अजित पवार म्हणाले की, १ जुलै २०२३ रोजी आमदार रोहित पवार यांनी २२ जूनला दिलेले पत्र मिळाले. कर्जत जामखेडमध्ये MIDC बाबत होते. त्यावर विभागाने येत्या पावसाळी अधिवेशनात सर्व संबंधितांसोबत बैठकीचे आयोजन करून उचित निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे उपोषण आंदोलन मागे घेण्यात यावे असं कळवले होते. मंत्री महोदयांनी पत्र दिले, अधिवेशन संपले नाही. आता दुसरा आठवडा सुरू झालाय. लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांनी आणि विभागाच्या अधिकाऱ्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीर दखल घ्यायला हवी अशारितीने आंदोलनाला बसणे उचित नाही अशा शब्दात अजित पवारांनी रोहित पवारांना फटकारले.

त्यावर रोहित पवार यांनी प्रत्युत्तर देत अजितदादा धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख आहे. MIDC चा विषय हा आजचा नाही तर केवळ अधिसूचना काढून पुढील कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मी वारंवार मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना भेटून विनंती केली, निवेदनं दिली, विधानसभेतही आवाज उठवला. परंतु राजकीय दबावाला बळी पडत सरकारने प्रत्येक वेळी माझी आश्वासनावर बोळवण केली. त्यामुळं नाईलाजाने उपोषणाला बसण्याचा निर्णय घ्यावा लागला. उपमुख्यमंत्री म्हणून आपणच याकामी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला तर माझा संपूर्ण मतदारसंघ आपला कायमस्वरूपी आभारी राहील अशी मागणी केली आहे.

उदय सामंतांचं आश्वासन, रोहित पवारांचं आंदोलन मागे

“एमआयडीसी संदर्भातील निर्णयासाठी बैठक बोलावण्यात येईल, असं आश्वासन दिलं होतं. अधिसूचना काढण्यासाठी उद्योग विभाग सकारात्मक असून, तातडीने निर्णय घेईल. रोहित पवारांचं आंदोलन त्यांच्या मतदारसंघासाठी होतं. जेव्हा लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने आंदोलन करतात तेव्हा सरकारने त्याची नोंद घ्यायची असते. त्यामुळे मी त्यांना जाऊन भेटलो. विनंती केली. त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला”, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या