Wednesday, April 24, 2024
Homeनगरपरतीच्या पावसाने खरिपाची पिके भुईसपाट

परतीच्या पावसाने खरिपाची पिके भुईसपाट

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्याच्या पुर्वभागातील टाकळीभान परिसरात परतीच्या पावसाने खरीपाच्या पिकांची पुरती दाणादाण केली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकर्‍यांसह व शेतमजुरांची दिवाळी अंधारात जाणार आहे. सततच्या पावसाने खरिपाची पिके हातची गेल्याने सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच तातडीने नुकसान भरपाई देऊन खचलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

परतीच्या पावसाने संपूर्ण राज्यासह श्रीरामपूर तालुक्याच्या पुर्वभागातील टाकळीभान परिसरातही हाहाकार माजवला आहे. आधीच आर्थिक अडचणीवर मात करुन खरीप हंगाम शेतकर्‍यांनी कसाबसा कष्टाने उभा केला होता. सुरवातीला खरीप पिकांच्या पेरणीला पावसाने ओढ दिल्याने पेरा सुमारे महिनाभर उशिराने झाला होता. त्यातच पिके चांगली तरारली असताना पुन्हा पावसाने ओढ दिल्याने शेतकर्‍यांनी आटापिटा करुन व वीजेच्या सततच्या भारनियमनामुळे रात्रीचा दिवस करुन पिकांना पाणी दिले होते.

मात्र त्यानंतर पिके परीपक्व होताना पुन्हा पावसाचे धुमशान सुरु झाले. गेल्या पंधरवाड्यात पिक चांगल्या प्रकारे काढणीला आली होती. मात्र परतीच्या पावसाने थैमान घातल्याने काढणीला आलेली सोयाबीन, कपाशी, मका व इतर पिके पाण्याखाली गेली. कपाशीच्या वाती झाल्या तर सोयाबीनची पिके सतत पाण्याखाली असल्याने काळी पडली आहे. मका व इतर पिकांचीही पुर्णपणे नासाडी झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने अक्षरशः हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. पिके पाण्याखाली असल्याने मजुरांच्याही हाताला काम नाही. त्यामुळे मजुरही हातावर हात धरुन बसले आहेत.

दिवाळीचा सण तोंडावर आला असतानाच पिके हातची गेल्याने शेतकर्‍यांची आर्थिक उलाढाल बंद झाली आहे. बाजारपेठेत व्यापारी शेतकर्‍यांना उधार उसनवारी देण्यास तयार नाहीत. त्यामुळे वर्षातील सर्वात मोठा सण आसलेली दिवाळी अंधारात जाणार आहे. मुलाबाळांना कपडालत्ता घेण्याचीही ऐपत शेतकर्‍यांमध्ये राहीली नसल्याने शेतकर्‍यांची मुले रडकुंडीला आल्याचे पहावयास मिळत आहे. परतीच्या पावसाने खरीप हंगामच वाया गेल्याने सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन आर्थिक आरिष्टात सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या