सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम पूर्ण द्यावी

jalgaon-digital
2 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपरिषदेने सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना 7 व्या वेतन आयोगाच्या प्रदान केलेल्या फरकाच्या रकमा कमी देण्यात आलेल्या आहेत. तरी या फरकाच्या रकमा पूर्ण स्वरुपात देण्यात याव्यात, अशी मागणी श्रीरामपूर नगरपरिषद सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशनने केली आहे.

श्रीरामपूर नगरपरिषदेने सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना 7 वा वेतन 1 जानेवारी 2016 पासून देय असलेल्या फरकाचे 5 टप्प्यामध्ये वाटप करण्याच्या सुचना दिल्या होत्या व त्यासाठी शासनाने 2 हप्त्याचे वाटप करणेसाठी श्रीरामपूर नगरपरिषदेस 4 कोटी 96 लक्ष रुपयाचे अनुदान दिले आहे.

पहिल्या व दुसर्‍या हप्त्याने अनुदानाचे वाटप करताना श्रीरामपूर नगरपरिषदेने नियम डावलून वाटप केले आहे. पहिल्या व दुसर्‍या हप्त्याची कमी रक्कम बहुतांश कर्मचार्‍यांना वाटप केली, त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचार्‍यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्याबाबत मुख्याधिकारी व नगरपरिषदेचे लेखापाल यांची समक्ष भेट घेतली असता उडवा-उडवीची उत्तरे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना दिली गेली. काही कर्मचार्‍यांना तर फरकच दिलेला नाही. जो दिला गेला आहे तो चुकीचा दिला म्हणून आपणाकडे नाईलाजास्तव तक्रार करावी लागत आहे.

श्रीरामपूर नगरपरिषदेने 2 हप्त्याची फरकाच्या रकमेची जी मागणी करण्यात आली होती ती चुकीची असल्याने नगरपरिषदेला कमी अनुदान प्राप्त झाले. याबाबत संघटनेने वारंवार मुख्याधिकारी व लेखापाल यांना भेटून 7 वा आयोग लागू होऊन 3 ते 4 वर्षाचा कालावधी होऊन देखील मुळ सेवा पुस्तकात नोंदी घेण्यात आलेल्या नाहीत व सह्या घेण्यात आलेल्या नाहीत. मागील वर्षी संघटनेने याप्रकरणी आमरण उपोषण केले होते. त्यावेळी उपोषण सोडताना मुख्याधिकारी यांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचारी यांचे देय रकमेचे तपशील सर्व कर्मचार्‍यांना देण्यात येतील, असे लेखी आश्वासन देवून देखील आज पावेतो कोणत्याही कर्मचार्‍याला देय रकमेचा तपशील दिलेला नाही.

ज्या कर्मचार्‍यांना 24 वर्षाची कालबध्द पदोन्नती लागू केली त्यांना 2019 पासून कालबध्द पदोन्नती प्रमाणे सेवानिवृत्ती वेतन अदा केले जात आहे. मात्र फरकाच्या रकमा काढताना कालबध्द पदोन्नती धरणेत आलेली नाही अशी विसंगती झालेली आहे.

श्रीरामपूर नगरपालिका यांनी प्रदान केलेल्या रकमा कमी असल्याने पूर्ण रक्कम देणेकामी आदेश देण्यात यावेत. तसेच काही सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना पाचही हप्ते घरपट्टीत समायोजन केले असून त्यांना फरकाची संपूर्ण रक्कम अदा केली आहे, त्याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही श्रीरामपूर नगरपरिषद सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशनने केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *