“थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल तर राजीनामा द्या आणि….”

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई l Mumbai

शिंदे गट आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे शिंदे गटात इनकमिंग वाढत आहे. दुसरीकडे शिवसेनेतून गळतीचे प्रमाण वाढलं आहे. शिवसेना नेमकी कोणाची? यावरुनही आता वाद सुरू झाला आहे. शिवसेनेनी मात्र आता पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

जाणाऱ्यांना अडवण्यापेक्षा नवीन लोकांना संधी देण्याचं काम करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी आता शुद्धीकरम मोहिम हाती घेतल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आपली निष्ठा यात्रा सुरू केली आहे. निष्ठा यात्रे निमित्त आदित्य ठाकरे हे मुंबईतील दहिसर भागात आले असता त्यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना बंडखोरांवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, जे स्वत:च्या मनाने गेले असतील, काही दडपण असतील त्यांच्यावर इतर काही वेगळ्या गोष्टी असतील, त्यांना मला एकच निरोप द्यायचा आहे. जिथे तुम्ही गेलात तिथे आनंदी रहा, सुखी रहा. तुमच्या बद्दल आमच्या मनात राग, द्वेष नाही. दु:ख निश्चित आहे की आम्ही तुम्हाला शिवसैनिक समजायचो, तुमच्यावर विश्वास ठेवला होता.’

तसेच, ‘पण मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की, तुमच्यात थोडी जर लाज उरली असेल, हिंमत उरली असेल तर पुन्हा आमदार होण्यासाठी राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा आणि मग जनता जो निकाल देईल तो मला मान्य आहे.’ असं आव्हान आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना दिलं.

पूढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हंटल की, ‘दिवसभर क्लेषदायक चित्र बघून घरी आलो तेव्हा मला आपले काही शिवसैनिक भेटले. तेव्हा लक्षात आलं की आपल्याबद्दल अजूनही आपल्याबद्दल प्रेम आहे. जे फुटीर आहेत त्यांच्या भावना खऱ्या नाहीत. जे पळून गेले ते गेले, पण सर्वसामान्य शिवसैनिक शिवसेनेसोबत आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान 2-3 तगडे शिवसैनिक असे आहेत जे निवडून येतील.’

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *