Friday, April 26, 2024
Homeब्लॉग'या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे...'; स्मृतीदिनानिमित्त अरुण दातेंच्या आठवणींना उजाळा

‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे…’; स्मृतीदिनानिमित्त अरुण दातेंच्या आठवणींना उजाळा

जयकृष्ण पु. पुराणिक, नाशिक.

अरुण रामूभैय्या दाते

- Advertisement -

जन्मतारीख : ४ मे, १९३४

जन्मस्थळ : इंदूर.

मृत्यूची तारीख : ६ मे २०१८

गायन प्रकार : भावगीत गायन

अरुण दाते हे एक मराठी भावगीतांचे नामवंत गायक होते. अरुण दातेंचे वडील रामूभैय्या दाते हे इंदूरमधील प्रतिष्ठेचे गायक होते. त्यांच्या इच्छेनुसार अरुण दाते गायक झाले. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे सुरुवातीला गाणे शिकले. त्यांनी पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले.

अरूण दाते यांनी मुंबईमध्ये कापड अभियांत्रिकीचा अभ्यास सुरू केला (जय हो! टेक्टाईल अभियंता!). अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षीच्या परीक्षेत अरुण दाते नापास झाल्यावर वडिलांनी त्यांना गाणे शिकण्याचे प्रोत्साहन दिले. अरुण दाते १९५५ पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. १९६२ मध्ये शुक्रतारा मंदवारा या अरुण दाते यांच्या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे त्यांना आग्रह करीत.

आपण हिंदीभाषिक प्रदेशातील असल्याने आपले मराठी उच्चार शुद्ध नसल्याचे कारण सांगून दाते यांनी सुरुवातीला तीन वर्षे ते गाण्याचे टाळले. शेवटी एकदा ते ध्वनिमुद्रित झाले आणि अफाट गाजले. पुढे अरुण दाते आपल्या कार्यक्रमांतही ‘शुक्र तारा’ गाऊ लागले. वयाच्या पन्‍नाशीत त्यांनी भावगीतांवर आपले लक्ष केंद्रित केले. इ.स. २०१० पर्यंत अरुण दाते यांचे शुक्रतारा या नावाने होणाऱ्या मराठी भावगीत गायनाचे २५०० हून अधिक कार्यक्रम झाले. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक आल्बमही लोकप्रिय आहेत.

मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायक या त्रिकुटाने मराठी भावगीताला परत अफाट लोकप्रियता प्राप्त करून दिली. अरुण दाते यांनी लता मंगेशकर,आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, कविता कृष्णमूर्ती, पुष्पा पागधरे यांच्याबरोबर द्वंद्वगीते गायली आहेत. ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचे दिनांक ६ मे २०१८ रोजी मुंबईतील कांजूरमार्ग येथील निवासस्थानी निधन झाले व हा भूलोकीचा गंधर्व, देवांच्या सभेत गायला स्वर्गस्थ झाला!

अरुण दाते यांच्या गाजलेल्या गाण्यांची यादी खूप मोठी आहे. त्यातील थोडीच निवडक गाणी येथे देत आहे.

असेन मी नसेन मी

(शांता शेळके, यशवंत देव).

उषःकाल होता होता

जपून चाल पोरी जपून चाल

जेव्हा तिची नि माझी

डोळे कशासाठी

डोळ्यांत सांजवेळी

दिल्या घेतल्या वचनांची

दिवस तुझे हे फुलायचे

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी

(मंगेश पाडगावकर,यशवंत देव) – निश्चित रडविणारे गाणे

भेट तुझी माझी स्मरते

(मंगेश पाडगावकर,यशवंत देव).

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

(मंगेश पाडगावकर,यशवंत देव).

सूर मागू तुला मी कसा

(सुरेश भट,हृदयनाथ मंगेशकर)

स्वरगंगेच्या काठावरती, वचन दिले तू मला

(शंकर वैद्य,हृदयनाथ मंगेशकर)

पुन्हःपुन्हा ऐकावी अशी ही खरोखरीची भावपूर्ण भावगीते

“भारावून टाकणारी”

गायक+गीतकार+संगीतकार

त्रिमूर्तींची, ह्रदयाला थेट भिडणारी, नवल नवलाई जादुई!

अरुण दाते यांनी ‘शतदा प्रेम करावे’ या नावाचे एक आत्मचरित्र लिहिले आहे. हे पुस्तक पूर्वी १९८६ साली प्रसिद्ध झाले होते, पण बाजारात मिळत नसल्याने नव्याने प्रकाशित होत आहे. अरुण दाते यांनी ‘शुक्रतारा’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले असून त्याचे शब्दांकन सुलभा तेरणीकर यांचे आहे. दाते यांनी ‘शुक्रतारा’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले अशी त्यावेळी समोर आली होती. पण तिची सत्यता पडताळून पाहता आली नाही. त्यामुळे ती बातमी अनेक ठिकाणी वाचायला मिळाली होती. तसेच सुरेश ठाकुर यांचाही ‘शतदा प्रेम करावे’ याच नांवाचा ललित लेखसंग्रह आहे.

अरुण दाते यांना मिळालेले पुरस्कार

पहिला गजाननराव वाटवे पुरस्कार (२०१०).

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार (२०१६).

- Advertisment -

ताज्या बातम्या