Wednesday, April 24, 2024
Homeनगरनामंजूर निविदा जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकार्‍यात मंजूर करून घ्या

नामंजूर निविदा जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकार्‍यात मंजूर करून घ्या

कोपरगाव |प्रतिनिधी|Kopargav

नगरपरिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी नामंजूर केलेल्या विकासकामांच्या निविदा जिल्हाधिकार्‍यांच्या विशेष अधिकारात

- Advertisement -

नगरपालिका कलम (308) अन्वये मंजूर करून घेवून शहरवासियांचे विकासाचे प्रश्न सोडवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, नगरपरिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत बांधकाम विभाग, पाणी पुरवठा, आरोग्य विभाग अशा अनेक विभागांच्या निविदा मंजुर करण्याबाबतचे विषय मंजुरीकरिता घेण्यात आले होते. यामध्ये शहरातील मुख्य बाजारपेठ, तसेच तहसील कार्यालय, पंचायत समिती या व्यतिरिक्त विविध शासकीय कार्यालयाकडे जाणारे रस्ते व कोपरगाव शहरातील पाच प्रभागांना जोडणार्‍या रस्त्यांचा यामध्ये समावेश होता.

या रस्त्यांचा जवळपास 25 हजार नागरिकांना तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नियमितपणे दळणवळणासाठी उपयोग होत असतो. तसेच शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहराला पाणी पुरवठा करणार्‍या टाक्या स्वच्छतेचा विषय देखील अत्यंत महत्वाचा होता. मात्र बहुमताचा चुकीचा वापर करून स्वहिताचे कामे मंजुरीसाठी नाहीत हे पाहून कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी शहर विकासाला तिलांजली देत व्यक्तिगत स्वार्थासाठी सर्व निविदा जाणून बुजून हेतुपुरस्कर नामंजूर केल्या आहेत.

शहराच्या रखडलेल्या विकास कामांना चालना मिळावी यासाठी स्थायी समितीच्या सभेत शहरातील विविध प्रभागातील विकासकामांच्या निविदा मंजुरीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र या निविदा सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी नामंजूर केल्या. त्या निषेधार्थ सर्वपक्षीय निषेध आंदोलन देखील करण्यात आले.

शहरविकासाची कास धरून करण्यात आलेल्या आंदोलनाला कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी स्टंटबाजी संबोधलं आहे. यावरून त्यांना विकासकामांशी काही देणं-घेणं नसल्याचे दिसून येत आहे. जनहिताच्या विरोधात जर एखादा चुकीचा निर्णय घेतला गेला तर जिल्हाधिकार्‍यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

त्यानुसार समाज हिताचा विचार करून शहरविकासाच्या नामंजूर करण्यात आलेल्या सर्व निविदा जिल्हाधिकार्‍यांच्या विशेष अधिकारात मंजूर करून घ्याव्यात अशी मागणी दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, हाजी महेमुद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, राहुल देवळालीकर, फकिरमामु कुरेशी, रमेश गवळी, दिनकर खरे, संदीप कपिले, वाल्मिक लहिरे, डॉ. तुषार गलांडे, विजय चवंडके, चंद्रशेखर म्हस्के, गणेश लकारे, विजय नागरे, सागर लकारे, कार्तिक सरदार, संतोष शेलार, रोहित खंडागळे, लक्ष्मण आमले, शुभम दुशिंग, विकास बेंद्रे, ऋषिकेश खैरनार, विकी जोशी, रवींद्र राऊत, संतोष नजन, गणेश बोरुडे, लक्ष्मण सुंदर, आकाश डागा, दिनेश संत, अझरुद्दीन शेख, साहिल शेख आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या