Saturday, April 27, 2024
Homeनगरभरतीसाठी सादर केले प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र बनावट

भरतीसाठी सादर केले प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र बनावट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर पोलिस दलात भरतीसाठी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या आरक्षीत जागेवर भरतीसाठी आलेल्या तरुणाने प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र सादर करुन पोलिस दलाची व शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे संबंधीत युवकावर तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिस नियंत्रण कक्षातील साहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र गोपाळ साबळे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आनंद खरात (रा.बावणे पांगरी, ता.बदनापूर, जि.जालना) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. जिल्हा पोलिस दलात गेल्या दोन महिन्यांपासून पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत जिल्हा पोलिस दलात प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त या समांतर आरक्षणातून अंतीम निवड यादीत समावेश करण्यात आलेल्या 7 उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची जबाबदारी फिर्यादी पोलीस निरिक्षक साबळे यांच्यावर होती. त्यांनी सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी गाव पातळीवर जावून केली. त्यावेळी खरात याने सादर केलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले.

त्याने प्रमाणपत्रात त्याच्या आजोबांची जमीन मंगळूर (ता.माजलगाव, जि.बीड) येथील प्रकल्पात संपादीत केली असल्याचे नमूद केले होते. मात्र, त्याने नमूद केलेले क्षेत्र हे दुसर्‍याच एका मयत व्यक्तीच्या नावे असल्याचे आढळून आले. तसेच मंगळूर गावातील ग्रामसेवक व कामगार तलाठी यांनी आनंद खरात या गावचे रहिवासी नसल्याचे सांगितले. सर्व कागदपत्रांच्या पडताळणीत आनंद खरात याने प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र सादर करुन जिल्हा पोलिस दलासह शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्याने साबळे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात आनंद खरात यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या