मुठभर धान्यासाठी गोरगरीब नागरिकांचा जीव टांगणीला

jalgaon-digital
4 Min Read

कर्जत |वार्ताहर|Karjat

मुठभर धान्यासाठी शहरामध्ये गोरगरीब नागरिकांचा जीव टांगणीला लागत असून दिवसभर अधूनमधून पडणार्‍या पावसात रांगा लावूनही धान्य न मिळाल्यामुळे रिकाम्या पिशव्या घेऊन रिकाम्या हाताने गरीब, वृद्ध महिला व पुरुषांना परत घरी जावे लागले.

केंद्र सरकारने गोरगरीब नागरिकांसाठी मोफत धान्य स्वस्त धान्य दुकानांमधून वाटप करण्याची घोषणा केली आहे. परंतु ग्रामीण भागात या दाण्यासाठी गोरगरीब नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचे दिसून येते. करोना विषाणूंचा प्रादुर्भाव सर्वत्र झपाट्याने पसरत असताना प्रशासनाने सामाजिक अंतर व मास्क लावण्याचा नियम केला; परंतु पोटाला दोन घास मिळावे म्हणून गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानांच्यासमोर उभे राहून रांगेत उभे असल्याचे भयानक चित्र कर्जतमध्ये दिसून आले.

यावेळी कोठेही सामाजिक अंतर नव्हते तर अनेकांच्या तोंडाला मास्क नव्हते. आश्चर्य म्हणजे ज्या वृद्ध व्यक्तींना या जीवघेण्या आजारापासून धोका आहे, अशी वृद्ध व्यक्ती या रांगेमध्ये उभी असल्याचे दिसून आले. हे चित्र पाहिल्यावर खाण्यासाठी प्रशासन या गोरगरीब नागरिकांच्या जीवावर उठले आहे काय? असा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.

केंद्र सरकारकडून येत असलेले धान्य हे जुलै महिन्यातील होते. याचे वाटप ऑगस्ट महिन्यात होत आहे. यासाठी प्रशासनाने अवघे तीन दिवस दिले आणि धान्य वाटपाचा शेवटचा दिवस होता. कर्जत शहरातील स्वस्त धान्य दुकानासमोर सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या.

अशा परिस्थितीमध्ये दिवसभर उपाशीपोटी ताटकळत थांबले होते. दिवसभर थांबूनही दुकानाची ठसा घेणारे मशीन काही सुरू झाले नाही. केवळ धान्य दुकानामधील ठसे दर्शवणारे मशीन सतत बंद पडतात. म्हणून नागरिकांना धान्य मिळाले नाही.

यावेळी उपस्थित नागरिक व महिलांनी देखील दोन दिवसांपासून चकरा मारूनही धान्य मिळत नाही. सकाळपासून उपाशी पोटी रांगेत उभे आहोत, अशा तक्रारींचा पाढा वाचला.

यावेळी धान्य दुकानदार संचालक शिंदे व नेवसे यांनी सांगितले की, सर्व नागरिकांचे धान्य याच आठवड्यामध्ये प्राप्त झाले असून त्याचे वाटप तीन दिवसांपासून सुरू केले आहे; परंतु इंटरनेट कनेक्शनमध्ये अडचण आल्यामुळे धान्य वाटपास अडचण होत आहे. याबाबत तहसील कार्यालयास माहिती देण्यात आली आहे. यंत्रणा सुरळीत झाल्यावर आम्ही वरिष्ठांच्या सुचनेनुसार धान्याचे वितरण करू असे सांगितले.

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर संतप्त

हा सर्व प्रकार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर यांना समजला सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ते या स्वस्त धान्य दुकानात आले आणि गोरगरीब नागरिकांची अवस्था पाहून हे राज्यातील सरकार गोरगरिबांचा जीव घेऊनच थांबणार काय? असा सवाल यावेळी उपस्थित केला. केंद्र सरकारने दिलेले धान्य देखील राज्य सरकारला वाटता येत नाही आणि स्थानिक लोकप्रतिनिधीला तर याचे देणे-घेणे उरले नाही, अशी गंभीर टीका खेडकर यांनी यावेळी केली.

यानंतर त्यांनी तहसीलदार नानासाहेब बागडे यांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले व त्यांच्यासोबत गोरगरिबांना त्यांच्या हक्काचे धान्य तरी द्या साहेब, असा प्रश्न उपस्थित केला त्यावर तहसीलदार यांनी सर्वत्र हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला आहे. मंत्रालयामध्ये याबाबत कळविले असून मुदतवाढ मिळताच या सर्व नागरिकांचे धान्य त्यांना देण्यात येईल हे धान्य कुठेही जाणार नाही परंतु त्यांना ते फक्त नंतर देऊ, असे उत्तर दिले.

यानंतर त्यांनी उपस्थित सर्व नागरिकांची यादी करून त्यांचे फोन नंबर लिहून घेण्यास स्वस्त धान्य दुकानदार चालकास सांगितले. अशोक खेडकर म्हणाले, ही खूपच गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे . प्रशासनाने गोरगरीब नागरिकांची व्यवस्था करण्याची गरज आहे. मुठभर धान्यासाठी यांच्या जीवावर हे सरकार उठले आहे आणि ही बाब खूपच चिंताजनक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *