Saturday, April 27, 2024
Homeनगरसाडेतीन लाखाची खंडणी मागणारे तीन आरोपी जेरबंद

साडेतीन लाखाची खंडणी मागणारे तीन आरोपी जेरबंद

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

अज्ञात तीन इसमांनी लोणी (ता. राहाता) येथील भाऊसाहेब धोंडीराम देव्हारे (वय 48) यांना पिस्तुलाचा धाक दाखवून पांढरे रंगाचे कारमध्ये बसवुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने अपहरण केले. तसेच खिशातील रोख 11 हजार 500 रुपयासह विवो कंपनीचा मोबाईल व ताब्यातील पल्सर मोटारसायकल असा एकुण 48 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल काढुन घेतला. तसेच मारहाण करुन 3 लाख 50 हजार रुपयांची खंडणीची मागणी केली. या गुन्ह्यातील तीन सराईत गुन्हेगारांना जिल्हा गुन्हे विभागाच्या पथकाने जेरबंद केले.

- Advertisement -

दि. 27 एप्रिल 2022 रोजी भाऊसाहेब धोंडीराम देव्हारे, (रा. मुसळेवस्ती, लोणी, ता. राहाता) यांना किरण दुसिंग व इतर अज्ञात तीन इसमांनी लुटून त्यांचे अपहरण केले. लोहारे गांवातील मंदिरासमोर लोकांची गर्दी पाहुन भाऊसाहेब देव्हारे यांनी जीव वाचवण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडून मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने तेथे जमलेल्या लोकांनी कार अडवताच अज्ञात तीन इसम गाडी सोडुन पळुन गेले होते.

सदर घटनेबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गु.र.नं. 165/2022 भादंवि कलम 364 (अ), 397, 384, 34 सह आर्म अ‍ॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधिक्षक़ मनोज पाटील यांनी नगर गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणणेबाबत आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना आरोपीबाबतची माहिती मिळताच त्यांनी पथकास लागलीच रवाना केले. पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक भिमराज खसें, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव व चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन बेरड अशांनी मिळुन राहुरी येथे जावुन वेशांतर करुन सापळा लावुन थांबलेले असतांना आरोपी किरण दुशिंग हा एका पांढरे रंगाचे कारमधून खाली उतरताना दिसला त्यास शिताफीने ताब्यात घेवून त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग, (वय 27), रा. उंबरे, ता. राहुरी असे सांगितले. त्याच्याकडे चौकशी केली असता सुधीर मोकळ रा. पारेगांव, ता. कोपरगंव व संदीप कोरडे रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदा अशांनी मिळून गुन्हा केला असल्याचे सांगितले.

पोलीस पथक तात्काळ गणेशनगर, ता. संगमनेर येथे जावुन आरोपीचा शोध घेवून सुधीर संपत मोकळ (वय 23) रा. पारेगांव खुर्द, ता. कोपरगांव यास शिताफीने ताब्यात घेतले. संदीप कोरडे त्याच्या राहते घरी घोगरगांव, ता. श्रीगोंदा येथे ताब्यात घेतले. किरण दुशिंग याचेकडे स्विफ्ट गाडीबाबत विचारपुस केली असता त्याने सदरची गाडी ही मध्यप्रदेश राज्यातून चोरी केलेबाबत सांगितल्याने त्यास ताब्यातील 10 लाख रुपये किंमतीचे स्विफ्टकार ताब्यात घेवून तीनही आरोपींना संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर केले आहे. पुढील कारवाई संगमनेर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.

किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन खुन करणे, अपहरणासह खुन करणे, अपहरण करणे, जबरी चोरी असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या