संरक्षणाचे बंधन रक्षाबंधन

jalgaon-digital
5 Min Read

महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा, दक्षिण भारतात अवनी अवीट्टम, उत्तरेत कजरी पौर्णिमा अशा वेगवेगळ्या नावांनी हा सण साजरा केला जातो. इतिहासात चितौडची राणी कर्णावतीने हुमायून बादशाहाला पाठवलेल्या राखीची कथा अजरामर आहे. त्याआधीही राणी द्रौपदीने श्रीकृष्णाला बांधलेली साडीची चिंधी राखीचेच प्रतीक आहे.

या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घायुष्य व सुख लाभो मिळो अशी कामना करते. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणार्‍या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे.

काही प्रांतांत नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना, राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे. भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा होतो. या दिवशी बहिणी आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधतातच शिवाय बंधुत्वसमान नाते असलेल्या व्यक्तीसही राखी बांधतात.

बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, संयम आणि साहस. नि:स्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावाबहिणीचं नातं. पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायिला आहे. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे. स्त्री सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला उपदेश होय. फक्त स्त्री हक्क आणि स्त्रीला वरवर सन्मान देणार्‍या आतल्या गाठीच्या लोकांना तिचे महत्त्व कळत नाही. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:। यात्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:।’ ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा, म्हणजेच मानसन्मान, सत्कार होतो, तेथे सुशील, गुणी व उत्तम मुलं होतात आणि जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही. हा विचार लहानपणापासून समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न या सणाद्वारे केला जातो.

‘राखी’ या शब्दातच ‘रक्षण कर’

राख म्हणजे ‘सांभाळ’ हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असाह्य, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे.

आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले आहे. अशी ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार व सद्बुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे. सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, लोभ, मत्सर, वासना, द्वेष, राग इत्यादींकडे भावाने आपल्या य तिसर्‍या डोळ्याने पाहवे य हेतूने बहीण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनविते. इतका त्या टिळयाचा खोल अर्थ आहे.

राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे. या एवढ्याशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो व मन प्रफुल्लित होते. एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्त्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे. द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला (कृष्णाला) बांधलेली जरतारी शेल्याची चिंधी, गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, राजपूत रमणीने बाजूच्या राजाला पाठविलेले राखीचे ताट, श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा आज इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठविलेली ई-शुभेच्छापत्रसहित राखी काय या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावाबहिणींचे परस्परांवरील प्रेम.

स्त्री कितीही मोठी, मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून त्याला सुचवू इच्छिते. यात तिचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो. रक्ताचे नाते असणारे भाऊ बहीण असोत किंवा मानेलेले असो, पण या नात्यामागची भावना पवित्र व खरी आहे. यात कुठेही फसवणूक नाही. त्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते. अन् प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते.

तूच आमचा त्राता, रक्षणकर्ता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी वाहतात आणि उपयोगातल्या सगळ्या वस्तूंना देवराख्या बांधण्याची प्रथाही आढळते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *