राज्यसभा पोटनिवडणूकही लांबणीवर पडण्याची शक्यता

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपाठोपाठ आता राज्यसभा पोटनिवडणूक लांबणीवर टाकण्याचे निश्चित केले आहे. करोनाची दुसरी लाट आणि डेल्टा विषाणूचे कारण पुढे करत राज्य सरकारने भारत निवडणूक आयोगाला ( Election Commission of India ) राज्यसभा पोटनिवडणूक करोना साथीत न घेण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या पवित्र्यामुळे आघाडीत काँग्रेसची पुन्हा कोंडी झाली आहे.

मार्च २०२० मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले काँग्रेस खासदार राजीव सातव (Late Rajiv Satav ) यांचे १६ मे २०२१ रोजी दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर राज्यसभा सचिवालयाने १९ मे २०२१ रोजी सातव यांच्या निधनामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाल्याबाबतची अधिसूचना जारी केली. त्यानुसार ३० जून रोजी भारत निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र पाठवून राज्यसभा पोटनिवडणुकीबाबत विचारणा केली होती. आयोगाच्या पत्राला मुख्य सचिव सीताराम कुंटे (Chief Secretary Sitaram Kunte ) यांनी पत्र पाठवून उत्तर दिले.

महाराष्ट्रात करोनाची साथ सुरू असून दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. केंद्रीय आरोग्य विभागाने करोना नियंत्रणाबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्या सूचना लक्षात घेता सध्याच्या करोना साथीत पोटनिवडणूक घेणे योग्य होणार नाही, असे पत्रात नमूद केले आहे. तथापि आयोगाने उचित निर्णय घ्यावा,असे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात राज्यसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता मावळली आहे.

राज्यसभेची जागा जास्तीत जास्त एक वर्षासाठी रिक्त ठेवता येते. दिवंगत राजीव सातव यांची मुदत मार्च २०२६ मध्ये संपणार होती. त्यामुळे सातव यांच्या जागी राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या सदस्याला पोटनिवडणूक जेवढी लांबेल तेवढा कमी कालावधी मिळणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *