नगरच्या रेल्वे प्रशासनाला अग्निपथआंदोलनाची धास्ती

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अग्निपथ योजनेच्या विरोधात देशातील अनेक राज्यांत सुरू असलेल्या तरूणांच्या हिंसक आंदोलनाची धग कायम आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर रेल्वे प्रशासनही सर्तक झाले आहे. त्यांनी जिल्हा पोलीस दलाकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पत्र पाठविले आहे. दरम्यान, शहरातील पोलिसांनी रेल्वे स्थानक आणि परिसरातून रविवारी रुट मार्चही काढला.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या अग्निपथफ योजनेच्या विरोधात देशभर आंदोलन सुरू आहे. तरूणांकडून हिंसक आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनकर्त्यांनी रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या गाड्यांना आग लावली आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या गाड्यांना आग लावण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून रेल्वे प्रशासनाने जिल्हा पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे.

अहमदनगर, श्रीरामपूर, नारायडोह, राहुरी, विळद येथील स्टेशनवर उभ्या असलेल्या गाड्यांना संरक्षण म्हणून पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. आपल्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या गाड्यांच्या संरक्षणासाठी बंदोबस्त देण्यात द्यावा, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान रविवारी रेल्वे पोलीस व कोतवाली पोलिसांनी अहमदनगर रेल्वे स्थानक परिसरात रूट मार्च काढला. यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे हे पथकासह सहभागी झाले होते. रेल्वे पोलीस दलाचे आयपीएफ सतपाल सिंग, पीएसआय संजय लोणकर यांच्यासह अग्निशमन दलही या रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *