Thursday, April 25, 2024
Homeनगरराहुरी तालुक्यातील 14 गावांमध्ये तलाठी कार्यालयांसाठी निविदा प्रक्रिया सुरू

राहुरी तालुक्यातील 14 गावांमध्ये तलाठी कार्यालयांसाठी निविदा प्रक्रिया सुरू

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी मतदार संघातील 14 गावांमध्ये तलाठी कार्यालय बांधकाम करण्यासाठी सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीच्या खर्चास मार्च 2022 च्या अर्थसंकल्पात प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या तलाठी कार्यालयांच्या इमारत बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने व माजी मंत्री आमदार प्राजक्ततनपुरे यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला होता. राहुरी मतदार संघातील तलाठी कार्यालय अद्ययावत होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सध्या ठिकठिकाणी असणारी कार्यालये अडचणीची व अडगळीची होती. आता निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने कार्यालय उभारणीचा कार्यक्रम लवकरच हाती घेतला जाणार आहे.

तालुक्यातील खडांबे बुद्रुक, डिग्रस, धामोरी बुद्रुक, कात्रड, सोनगाव, निंभेरे, तांभेरे, कानडगाव, आरडगाव, उंबरे, कोंढवड, केंदळ बुद्रुक, मानोरी, पिंप्री वळण या गावांचा समावेश आहे. प्रत्येकी एक तलाठी कार्यालय उभारणीसाठी सुमारे 25 लाख रुपयांचा निधी मिळणार असून तलाठी कार्यालय सुसज्ज होणार आहेत. जागेच्या अडचणी व नैसर्गिक आपत्तीचा सामना तलाठी कार्यालयातील कर्मचार्‍यांना करावा लागत होता.

सध्या कार्यरत असलेल्या तलाठी कार्यालयांत पावसाळ्याच्या हंगामात पाणी साचून महत्त्वाची दस्तावेज व कागदपत्रे धोक्यात येत असत गळके छप्पर, उखडलेल्या फरशा यासह अन्य समस्यांचा सामना करावा लागत होता. आता निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने कार्यालयांना येणारी संकटाची मालिका संपुष्टात येणार आहे. आमदार तनपुरे यांनी अधिक लक्ष घालत निधी उपलब्ध करून दिल्याने सर्व 14 गावांतील विशेषतः शेतकर्‍यांनी व नागरिकांनी आमदार तनपुरे यांचे आभार मानले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या