Tuesday, April 23, 2024
Homeनगरचार्ज घेतला नी काही तासांत बदली करून निघून गेले

चार्ज घेतला नी काही तासांत बदली करून निघून गेले

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी ठरले औट घटकेचे. आले, चार्ज घेतला नी बदली करून निघून गेल्याने राहाता नगरपालिकेच्या नशिबी पुन्हा प्रभारीराज आले.

- Advertisement -

20 महिन्यांनंतर राहाता पालिकेला सुहास जगताप यांची कायम मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. 10 ऑगस्ट रोजी ते राहाता पालिकेत आले. त्यांनी पदभार स्विकारला, सत्कार घेतला व लगेच नगरला निघून गेले.

दुसर्‍याच दिवशी त्यांनी पुण्याला बदली करून घेतली. सत्काराचे हार तुरे टेबलावरून बाजूला जाण्याअगोदरच त्यांची बदली झाल्याने पालिका वर्तुळात तो एक चर्चेचा विषय बनला आहे. अनेक नगरसेवकांना माहीतही नव्हते कोण मुख्याधिकारी आले व बदलूनही गेले त्याची खमंग चर्चा मात्र चर्चीली जात आहे.

गेल्या वीस महिन्यांपासून राहाता पालिकेला मुख्याधिकारी नसल्याने पालिकेत प्रभारीराज सुरू आहे. संगमनेर, कोपरगावनंतर देवळाली प्रवराच्या मुख्याधिकारी यांच्याकडे प्रभारी कारभार दिला होता. नवीन मुख्याधिकारी जगताप आल्याने देवळाली प्रवराच्या प्रभारी मुख्याधिकारी यांनी सुटकेचा श्वास सोडण्याच्या आत आलेल्या मुख्याधिकारी यांनी पुण्याला बदली करून घेतल्याने पुन्हा राहाता पालिकेचा प्रभारी कारभार देवळालीच्या मुख्याधिकारी यांच्याकडे गेला.

कर्मचारी, अधिकारी व नागरिक तसेच नागरिकांनी मुख्याधिकारी आल्याने समाधान व्यक्त केले होते. मात्र त्यावर एका दिवसात विरजन पडल्याचे पहावयास मिळाले. गेल्या काही वर्षांपासून राहाता पालिकेची जागा रिक्त असूनही येथे येण्यास कुणीही अधिकारी धजत नसल्याची चर्चा आहे. नगरविकास मंत्री, मुख्यमंत्री व विविध खात्याच्या मंत्र्यांना निवेदन देऊन मागणी करूनही राहाता पालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नसल्याने चर्चेला उधान आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या