बारागाव नांदूरला यात्रोत्सवात तमाशास्थळावरून ‘राडा’

बारागाव नांदूर (वार्ताहर) – राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे कानिफनाथ यात्रोत्सवात तमाशा कार्यक्रमाच्या स्थळावरून वाद झाल्याने यात्रोत्सवाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला. यावेळी गावामध्ये तणावात्मक परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.

सालाबादप्रमाणे बारागाव नांदूर येथील कानिफनाथ महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी यात्रोत्सव समिती प्रयत्न करीत होती. दरम्यान, महाशिवरात्रीनंतर शेकडो तरुणांच्या फौजफाट्याने पुणतांबा येथून कावडीतून आणलेले पाणी कानिफनाथ महाराजांच्या मंदिरावर पडते. त्यानंतर काठ्या बसविल्यानंतर नऊ दिवस पारायण होतेे. या काळात ग्रामस्थांकडून भंडारा भाविकांसाठी दिला जातो. यात्रोत्सव अंतिम टप्प्यात आला असताना छबीना कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला.

दरम्यान, यात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी यात्रा समितीने रात्रीच्या वेळी तमाशा कार्यक्रम ठेवल्यास भांडण होतात. म्हणून यावर्षी दिवसा तमाशा कार्यक्रम करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानुसार काल शुक्रवारी सकाळी 9 वाजता तमाशा कार्यक्रम सुरू होताच काही तरूणांनी मारूती मंदिरापुढे तमाशा कार्यक्रम नको म्हणून विरोध केला. यावेळी गाव कमेटी व तरुण आमने सामने आल्याने तणावात्मक परिस्थिती निर्माण झाली. वाद पाहाता कमेटीने तमाशा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यासह सायंकाळी होणारा कुस्त्यांचा हगामाही न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तमाशा कार्यक्रम रद्द होताच गावामध्ये मोठी गर्दी जमा झाली. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना माहिती समजताच सहायक पोलीस उपनिरीक्षक सचिन बागूल, सानप व राक्षे यांच्यासह पोलिसांचे पथक गावात उपस्थित झाले. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी ग्रामस्थांशी चर्चा करीत घटना जाणून घेतली. यावेळी यात्रोत्सव समितीने सर्वच कार्यक्रम रद्द केले असल्याचे सांगितले.

यावेळी मुळाखोरे खोलेश्‍वर दूध संस्थेचे अध्यक्ष गोरक्षनाथ गाडे, गोविंद जाधव, इम्रान देशमुख, गौतम पवार यंानी कुस्त्यांचा हगामा रद्द न करण्याची मागणी केली. परंतु तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराजे पवार, समिती अध्यक्ष श्रीराम गाडे, बाळासाहेब गाडे, लक्ष्मण गाडे, विश्‍वास पवार, बाबाभाई इनामदार, जगन्नाथ गाडे, सोपानराव गाडे, विश्वास पवार, सहादू मंडलिक, संतोष शिंदे, वसंतराव गाडे, हमीदभाई इनामदार, उपसरपंच युवराज गाडे, निवृत्ती देशमुख, भाऊसाहेब कोहोकडे, योगेश गाडे, ज्ञानेश्वर आघाव, दिलीपराव कोहोकडे आदींनी आपले मत व्यक्त करीत यात्रोत्सवाचे कार्यक्रम रद्द करीत असल्याचे जाहीर केले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *