Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारदररोज शेकडो खासगी प्रवासी बसेस होताहेत मार्गस्थ

दररोज शेकडो खासगी प्रवासी बसेस होताहेत मार्गस्थ

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

लॉकडाऊनमध्ये एसटी महामंडळाच्या बसेससह इतर सर्वच खाजगी बसेसला वाहतूकीस परवानगी नसतांना गुजरात राज्यातून महाराष्ट्रात व महाराष्ट्रातून गुजरातमध्ये दररोज रात्रीतून शेकडो खाजगी बसेस, ट्रॅव्हेल्स सर्रासपणे वाहतूक करतांना दिसत आहेत.

- Advertisement -

मात्र, आरटीओ कार्यालयातील अधिकारी तसेच महामार्ग पोलीसांकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान, नवापूर तालुक्यातील आमलाण ग्रामस्थांनी या खाजगी बसेसला विरोध केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून एस.टी.महामंडळाच्या बसेस तसेच इतर सर्व खाजगी बसेसच्या वाहतूकीस बंदी आहे. तसेच नंदुरबार जिल्हयातून इतर जिल्हयात येणार्‍या वाहनांना बंदी असून राज्यबंदीदेखील आहे.

याशिवाय जिल्हयात प्रवेश करायचा असेल तर 48 तासांपुर्वी केलेली आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. नवापूर हे गाव महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर वसलेले आहे. याठिकाणी बेडकी येथे सीमा तपासणी नाका आहे. जिल्हयात खाजगी ट्रॅव्हेल्स व वाहनांना बंदी घातलेली असतांना येथून दररोज शेकडो खाजगी वाहने रात्रीतून पास होतांना दिसत आहेत. गावाबाहेरील एका ठिकाणी सदर ट्रॅव्हेल्स थांबत असून त्याठिकाणी दररोज मुंबई, पुणे, नाशिक, सुरत, अहमदाबाद, बडोदा आदी ठिकाणी या खाजगी बसेस रात्रीतून मार्गस्थ होत आहेत. मात्र, याकडे आरटीओ चेकपोस्टवर कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचार्‍यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. खाजगी ट्रॅव्हेल्सची वाहतूक करण्यासाठी याठिकाणी मोठा ‘अर्थ’पूर्ण व्यवहारही होत असल्याचे सांगण्यात येते.

याशिवाय विसरवाडी ते दहिवेल या महामार्गावर महामार्ग पोलीसांचे पोलीस मदत केंद्र आहे. एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यास किंवा इतर काही मदत हवी असल्यास अशा वाहनधारकांसाठी महामार्ग पोलीसांच्या मदत केंद्रातून तात्काळ मदत मिळणे अपेक्षित असतांना या पोलीसांसमोरूनच खाजगी ट्रॅव्हेल्स मार्गस्थ होत आहेत. मात्र, महामार्ग पोलीसदेखील ‘मुग गिळून गप्प’ आहेत. त्यामुळे एकही खाजगी बसेस महामार्ग पोलीसांकडून अडविले जात नाही किंवा त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे खाजगी बसचालकांकडून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार ज्या शासकीय यंत्रणेला आहे त्या आरटीओ व महामार्ग पोलीसांकडूनच खाजगी वाहतूकीला खतपाणी दिले जात आहे. ही गंभीर बाब आहे.

एरव्ही लहान लहान वाहनधारकांची वाहने अडवून त्यांच्याकडून आरटीपीसीआर रिपोर्ट मागवला जातो, लायसन्स, कागदपत्रे पाहिली जातात. मात्र, दररोज रात्रीतून मार्गस्थ होणार्‍या या शेकडो ट्रॅव्हेल्सवर कोणतीही कारवाई केली जात नाही. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दखल घेवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र-गुजरात सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणार्‍या व गुजरात मधून महाराष्ट्रात येणार्‍या वाहनातील प्रवाशांच्या आरटीपीसीआर रिपोर्ट पाहून त्यांना प्रवेश दिला जात असतो. मात्र रात्रीच्या वेळेस सीमेलगत असलेल्या ग्रामीण भागातील मार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू आहे. कोरोना काळात घातलेल्या निर्बंधांचे पालन केले जात नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवापूर तालुक्यातील आमलाण गावातून अनेक खाजगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसेस जात असल्याने गावकर्‍यांनी या गाडया अडविल्या. त्यामुळे गोंधळ उडाला होता. नवापूर पोलिसांनी त्या ठिकाणी जात त्या बसला गुजरात राज्यात परत पाठविले. रात्रीच्या वेळी नागपूर सुरत महामार्गावर वाहनांची गर्दी दिसत आहेत. नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात बंदोबस्त करीत आहेत. परंतु खाजगी बसेस गुजरात राज्यातील उच्छल, बाबरघाट आडमार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करीत आहे. याकडे संबंधीत यंत्रणेने लक्ष देवून कारवाई करण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या