Friday, April 26, 2024
Homeब्लॉगप्रौढत्वी निज शैशवास जपणे

प्रौढत्वी निज शैशवास जपणे

प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे…थोडेसे कवित्व अंगी असल्यामुळे की काय, माझ्यात दडलेले लहान मूल अजूनही मोठे व्हायला तयार नाही. नातवाबरोबर खेळताना तर मला वयाचा पूर्ण विसर पडतो. काही दिवसापूर्वीच मी माझ्या नातवाला ‘बेडुकउड्या’ मारण्यास शिकविले. त्यानेही माझ्या शिकवणीचे चांगले चीज केले व शाळेच्या ‘फ्रॉग रेस’ मध्ये दुसरा क्रमांक पटकावला!

डॉ. रवीन्द्र शिवदे.

घरातील मंडळींना माझा हा बालिशपणा अजिबात आवडत नाही. माणसाने आपल्या वयाचे भान ठेवावे असे त्यांचे मत असते. वारंवार सांगूनही माझ्यात सुधारणा होत नाही असे लक्षात आल्यामुळे त्यांनी सांगणे सोडून दिले आहे व आता फक्त नाक मुरडण्यापलिकडे ते आता काही करीत नाही.कधी कधी हा बालिशपणा मला महागातही पडतो. मन आणि शरीर यांच्या वयातील तफावत भोवते. तरीही हा बालिशपणा मी सोडत नाही, कारण त्यातून मला जगण्याची ऊर्जा मिळते व अपरंपार आनंद मिळतो. ही ऊर्जा जर नसती तर अर्धी नव्हे, पाऊण लाकडे अमरधामला गेलेल्या इतर म्हातार्‍यांप्रमाणे मी देखील पैलतीरी नेत्र लावून दिवस ढकलित राहिलो असतो व वाढत्या वयाबरोबर येणार्‍या शारीरिक तक्रारींचा पाढा येणार्‍या जाणार्‍या समोर वाचीत राहिलो असतो.पण बालिशपणा म्हणजे काय? बालिश माणूस नेमके काय करतो? खरोखर लहान मुलासारखा वागतो काय? की दोघांमध्ये काही फरक आहे?

- Advertisement -

मूल हे जात्याच स्वच्छंदी असते. त्याच्यावर कोणतीही जबाबदारी नसते. त्याच्याकडून गैरवर्तन घडले तरी त्याच्यासाठी त्याला शिक्षा होत नाही. उलट त्याच्या बालसुलभ खोड्यांचे कौतुकच होते. लहान मूल चिंतामुक्त असते. अंथरूणावर पडल्या पडल्या त्याला झोप लागते.पण वयाने वाढलेल्या एखाद्या माणसाला असे वागता येईल का? मुळीच नाही. प्रौढत्वाबरोबर येणार्‍या जबाबदार्‍या त्याला पार पाडाव्याच लागतात. एखाद्या गंभीरप्रसंगी तो जर लहान मुलासारखे वागू लागला, तर त्याची निर्भत्सना होईल. म्हणजेच, बालिशपणा म्हणजे पोरकटपणा नव्हे. पण बालिशपणा म्हणजे बालसुलभ वृत्ती, किंवा शैशव असा अर्थ घ्यायला हरकत नाही.

ही बालसुलभ वृत्ती किंवा शैशव म्हणजे नेमके काय असते हो?शैशव म्हणजे कुतुहूल. जिज्ञासा. आपल्या अवतीभोवती जे अफाट विश्व पसरले आहे, त्याची रहस्ये जाणून घ्यायची अनिवार इच्छा लहान मुलांना असते. त्याविषयी मोठ्या माणसांना प्रश्न विचारून ती भंडावून सोडतात. आणि मोठ्या माणसांना ही उत्तरे बहुतेक येत नाहीत. माझ्या मुलीने प्रवासात असताना विचारलेला प्रश्न मला आठवतो- ‘पप्पा, डोंगरांना जिने का नसतात?’मलाही जगातील सगळ्याच गोष्टींविषयी प्रचंड कुतुहूल वाटते. अणूपासून ब्रह्मांडापर्यंत. नवीन भाषा शिकण्याची, नवीन प्रदेश पाहण्याची, तिथल्या लोकांच्या राहणीविषयी माहिती करून घेण्याची मला प्रचंड उत्सुकता असते. कोणतेही प्रेक्षणीय स्थळ पाहण्यापूर्वी मी त्या स्थळाची खडान खडा माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी पुस्तके वाचतो. इंटरनेटवर शोध घेतो. स्थानिक लोकांची भाषा शिकण्याचा प्रयत्न करतो. एखादा चांगला गाईड घेतो. तो सांगत असलेले पुराण मेंदूत साठवण्याचा प्रयत्न करतो. प्रवासातही इतर लोक निद्रिस्त असतांना जागे राहून वाटेत कोणती गावे येतात ते डोळे टवकारून पाहतो.हे झाले स्थळांविषयी. एखाद्या विषयाचा अभ्यास करायला घेतला तरी माझे असेच होते. लहान मूल नवीन ठिकाणी गेल्यावर एका जागी स्वस्थ बसत नाही. ते घरभर हिंडते. प्रत्येक वस्तू हाताळून पाहते, तसेच माझे नवीन विषय शिकायला घेतला की होते. त्या विषयावरची शक्य तितकी पुस्तके मी गोळा करतो. रात्रीचा दिवस करून ती वाचतो. हां एक आहे. तो विषय माझा आवडता असला पाहिजे. सुदैवाने मला बरेच विषय आवडतात. साहित्य, भाषाशास्त्र, इतिहास, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, अध्यात्म, समाजकारण या सर्वच विषयांची मला गोडी आहे. त्यात मी रममाण होतो. आयुष्यभर अभ्यास केला तरी तो पूर्ण होणार नाही हे मला माहीत आहे. पण जिज्ञासा ज्या दिवशी लुप्त होईल, त्या दिवशी मी म्हातारा होईन.शैशवाचे दुसरे लक्षण म्हणजे धडपडण्याची हौस. नवीन गोष्ट, नवीन साहस करून पहाण्याचे अनिवार आकर्षण. बहुधा समंजस आणि विचारी माणूस करणार नाही अशा या गोष्टी असतात. यात ट्रेकींग आणि इतर साहसी खेळांचाही समावेश होतो. एखादी जन्माची अद्दल घडेपर्यंत (किंवा कधी कधी त्यानंतरही) हे खेळ सुरूच राहतात. मला डोंगरांचे आकर्षण बालवयापासूनच होते. आणि व्यवसायातून थोडीशी उसंत मिळताच मी ट्रेकिंगला सुरूवात केली. सोबत बहुतेक शाळा कॉलेजची मुलेच असतात. किंवा आमच्यासारखी शिंगे मोडून वासरांत शिरलेली काही लहान कम थोर मंडळी! ट्रेकवरून परत आल्यावर माणूस आणखी काही वर्षांनी लहान होतो. याच नादात मी महाराष्ट्रातले बहुतेक डोंगरी किल्ले फिरलो. पन्हाळगड- पावनखिंड- विशाळगड ही पदयात्रा नऊ वेळा पूर्ण केली. हिमरेषा अनेकदा पार केली. तामीळनाडूचे डोंगर देखील सोडले नाहीत. जोपर्यंत पाय चालत आहेत तोपर्यंत हा उद्योग पुरेल. अशाच काही छांदिष्ट मित्रांच्या नादाने वयाच्या 54 व्या वर्षी मी मॅरेथॉन रनिंगला सुरूवात केली. 11 फुल मॅरेथॉन व असंख्य हाफ मँरेथॉन झाल्या तरी अजून नवीन रेस जाहीर झाली की फॉर्म भरण्याची सुरसुरी येतेच. कारण माझ्याहून वयस्कर मंडळी देखील फॉर्म भरीत असतात!हा बालिशपणा कधी जाईल ही आशा मी सोडून दिली आहे. कारण माझे एक ज्येष्ठ सहकारी डॉ. अनिल गाडगीळ नेहमी म्हणतात, ‘म्हातारं फक्त शरीर होतं, मन कधीच म्हातारं होत नाही!’

- Advertisment -

ताज्या बातम्या