Friday, April 26, 2024
Homeनाशिकखरीप पेरणीसाठी कृषी विभागाकडून तयारी

खरीप पेरणीसाठी कृषी विभागाकडून तयारी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असली तरी अनेक भागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत अजूनही आहेत. पावसाची प्रतीक्षा करत असतानाच शेतक़र्‍यांकडून खरीप हंगामाची जोरदार तयारीही सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या कृषी विभागानेही तयारी करून ठेवली आहे.

- Advertisement -

खरीप हंगाम 2023 करीता नाशिक जिल्ह्यासाठी 6.27 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची पेरणी होईल, असा अंदाज आहे. त्यानुसार जिल्ह्यासाठी युरीया, डीएपी, एमओपी व संयुक्त खतांची एकूण 2.60 लाख मेट्रिक टनाची मागणी नोंदविण्यात आली होती. शासनाकडून एकूण 2.23 लाख मे. टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. माहे 9 जून 2023 अखेर जिल्ह्यात युरीया खत 35,794 मेट्रिक टन, डीएपी 10,031 मेट्रिक टन, एमओपी 1,681, एसएसपी 14,470 मेट्रिक टन व संयुक्त खते 68,431 मेट्रिक टन असे एकूण एक लाख 38 हजार 107 मेट्रिक टन खत उपलब्ध आहे.

जिल्ह्याकरीता कापूस, भात, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, भुईमूग, तूर, मूग व उडीद, इत्यादी पिकांचे एकूण 77 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून मागणीप्रमाणे पुरवठा सुरू आहे.

16 भरारी पथकांची स्थापना

शेतकर्‍यांना विविध कृषि निविष्ठा या दर्जेदार व योग्य दराने शेतकर्‍यांच्या मागणीनुसार मिळण्याकरिता जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुकास्तरावर एक असे एकूण 16 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नाशिक यांच्या कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापण करण्यात आला आहे. शेतकर्‍यांनी कृषि निविष्ठांबाबत काही तक्रार असल्यास भ्रमणध्वनी क्रमांक 7821032408 यावर तसेच जवळच्या कृषि विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

ओल झाल्याशिवाय पेरणी करु नये

जिल्ह्यात खते व बियाण्याची पुरेशा प्रमाणात उपलब्धता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी पुरेशा प्रमाणात पाऊस व शेतात पेरणीयोग्य ओल झाल्याशिवाय पेरणी करु नये. तसेच कृषि निविष्ठा परवानाधारक विक्रेत्याकडून व पक्क्या बिलातच खरेदी कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या