Thursday, April 25, 2024
Homeनगरयावर्षी भरपूर पाऊस अन् शेतकर्‍यांसाठी ‘अच्छे दिन’

यावर्षी भरपूर पाऊस अन् शेतकर्‍यांसाठी ‘अच्छे दिन’

लोणी |वार्ताहर| Loni

आगामी पावसाळ्यात 20 जूनपासून पावसाला सुरुवात होईल आणि एकाआड एक नक्षत्रांचा भरपूर पाऊस पडेल, असे भाकीत करताना आगामी वर्ष शेतकर्‍यांना ‘अच्छे दिन’ घेऊन येणार असल्याचे लोणीचे ग्रामपुरोहित जितेंद्र धर्माधिकारी यांनी सांगितले. यंदा बळीराजा सुखावेल व सामान्य जनतेला ही सुखी जीवन जगता येईल असे भाकीत वैजापूर येथील स्मशान भूमीतील उभारलेल्या गुढीवरून गुरुजी सुभाष हतवळणे यांच्याकडून काढण्यात आले.

- Advertisement -

यावर्षी महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे पाऊस पडून अन्नधान्य मुबलक पिकले जाईल असा कौल कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी मातेने दिला आहे. यावर्षी चांगला पाऊस पडून धान्य समृद्धी होणार आहे असं गोधड महाराज संवत्सरीतील भाकित आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन हवामान विभागाने वर्तविलेल्या कमी पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर ही सर्व भाकितं नगरकरांना दिलासा देणारी आहेत. हवामान खात्याचा अंदाज खरा की, ही विविध भाकितं खरी ठरतात हे आगामी काळच ठरविणार आहे.

ग्रामपुरोहित धर्माधिकारी यांनी दाते पंचांगानुसार यावर्षीच्या पाऊस पाण्याचे भाकीत केले ते म्हणाले, मृग नक्षत्राच्या उत्तरार्धात 20 जूनला पावसाला सुरुवात होईल. 5 जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस होऊन खरीप पेरण्या होतील. 15 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत भरपूर पाऊस पडेल. बाजरी, सोयाबीनसह खरीप पिके उत्तम येतील. रोगराई कमी राहील. माणसांचे आरोग्यही चांगले राहील.नकारात्मकता कुठेही नसेल. मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, पूर्वा, उत्तरा या नक्षत्रांचा खूप पाऊस पडेल. सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असे भाकीत त्यांनी वर्तविले.

कोणतेही नियम न पाळता बेकायदा बांधकाम करणारांना ग्रामपंचायतीकडून कोणतीही सुविधा देऊ नये, अशी सूचना ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्यानंतर तसा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

वैजापूर स्मशान भूमीतील गुढीचा अंदाज

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

सर्व खड्ड्यांत जवळपास समसमान ज्वारीचे दाणे निघाल्याने यावर्षी पाऊस समाधानकारक राहील. पीक-पाणी उत्तम राहील व तेजी-मंदी फारशी राहणार नाही. बळीराजा सुखावेल व सामान्य जनतेलाही सुखी जीवन जगता येईल, असे भाकीत या गुढीवरून गुरुजी सुभाष हतवळणे यांच्याकडून काढण्यात आले.

भारतीय परंपरेत व संस्कृतीत साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडवा वैजापुरात वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. पाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवार दि. 21 मार्च रोजी सायंकाळी स्मशानभूमीत जेथे अंत्यविधी झालेला असतो त्या जागेवर सडा शिंपडून बारा महिन्याचे बारा खड्डे केले जातात. त्यात ज्वारीचे 21दाणे टाकून ते रुईच्या पानांनी महिन्याची नावे लिहून झाकतात. याशिवाय चारही दिशेला पूर्व, पश्चिम, उत्तर,दक्षिण खड्डे करून त्यातही दाणे टाकतात, नंतर राजभाग व प्रजाभाग खड्डे करून त्यातही ज्वारीचे दाणे टाकतात असे एकूण 18 खड्डे करतात नंतर उत्तर दिशेला एक मडके जे गुढीचे प्रतीक म्हणून असते त्यावर पाने श्रीफळ ठेऊन विधिवत गुढीचे प्रतीक म्हणून असते.

या पूजेचा मान गावचे पोलीस पाटील यांना असतो गुलाबरावजी साळुंके त्यांच्या घरातील परिवार यांनी पूजा केली व नंतर आरती केली. दुसर्‍या दिवशी पाडवा असतो, बुधवार दि.22 मार्च रोजी पहाटेच नैवेद्य ठेवण्यात आला. शहर व परिसरातील नागरिकांनी सकाळी सात वाजेपर्यंत काक स्पर्शची वाट पाहिली. परंतु काक आलाच नाही, नंतर उपस्थित नागरिकांच्या समक्ष खड्यातील दाणे मोजले. जवळपास सर्वच खड्यात समान दाणे होते. नंतर पाटील गल्ली येथील मंदिरात येऊन गुरुजी सुभाष हतवळणे यांनी या वर्षाचे भाकीत उपस्थिती नागरिकांना एकविले.

सर्व खड्यात जवळपास समसमान ज्वारीचे दाणे निघाल्याने या वर्षी पाऊस समाधानकारक राहिल, पीक-पाणी उत्तम राहील, व तेजी-मंदी फारशी राहणार नाही, बळीराजा सुखावेल, व सामान्य जनतेला ही सुखी जीवन जगता येईल असे भाकीत या गुढीवरून काढण्यात आले, वर्षाचा हा आराखडा असल्याने शहर व परिसरातील नागरिक मोठया हौशीने जमतात, करोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून ही परंपरा खंडित झाली होती. परंतु या वर्षी ही खंडित परंपरा सुरू झाल्याने नागरिकांना आनंद झाला, फटाके फोडून गुढी पाडव्याचे स्वागत करून उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी माजी नगरसेवक लिमेश बापू वाणी,मधुकर साळुंके, शिवाजी साळुंके, राजेंद्र साळुंके यांनी पुढाकार घेतला, जेष्ठ पत्रकार घनश्याम वाणी,जेष्ठ समाजसेवक धोंडीरामसिंह राजपूत,झुंबरलाल शर्मा,सजन गायकवाड, बापू गावडे, से.नि. पोलीस अधिकारी सोपानराव निकम, सोपानराव वाणी, पोपट भोसले, इत्यादी असंख्य नागरिक उपस्थित होते.

कोपरगावच्या कालभैरवनाथ व माता जोगेश्वरीचा कौल

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी मातेने यावर्षी महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे पाऊस पडून अन्नधान्य मुबलक पिकले जाईल असा कौल दिला आहे. श्रीराम रतन पंचायतन भैरवनाथ जोगेश्वरी ट्रस्ट, चांदेकसारे ग्रामस्थ व पंचक्रोशीच्या उपस्थितीत गुढीपाडव्याच्या दिवशी हा कार्यक्रम संपन्न झाला.

बाल भैरवनाथांनी दिलेला कौल आत्तापर्यंत तंतोतंत खरा ठरला आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रामस्थ व पुरोहितांच्या उपस्थितीत पर्जन्यमान नक्षत्र तपासणीचा कार्यक्रम केला जातो. गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी रात्री अठरा नक्षत्ररुपी गाडग्याच्या आकाराचे खड्डे घेतले जातात. या खड्ड्यामध्ये वडाचे पाणे ठेवून या पानांमध्ये सप्तधान्य व पाणी साठविले जाते. रात्रभर ही नक्षत्र रुपी खड्डे झाकून ठेवली जातात. दुसर्‍या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरीची पुरोहितांच्या हस्ते विधिवत पूजा केली जाते व नंतर पर्जन्यमान व वर्षाच्या कार्यकाळ कसा जातो हे सांगण्यात येते.

सुधाकर होन, काकासाहेब गवळी, आप्पासाहेब वक्ते, किसन पवार, रमेश चांदर यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली व नंतर चालू वर्षात पर्जन्यमान कसे होईल हे सांगण्यात आले. नक्षत्र रुपी खड्ड्यामध्ये वडाच्या पानांमध्ये जर जास्त पाणी शिल्लक राहिले तर त्या नक्षत्रात चांगला पाऊस, ज्या नक्षत्ररुपी खड्ड्यात मध्यम पाणी शिल्लक राहील त्या नक्षत्रात मध्यम पाऊस तर ज्या नक्षत्र रुपी खड्ड्यात पाणीच शिल्लक राहणार नाही ते नक्षत्र कोरडे जाणार असल्याचे कोईक सांगितले जाते. प्रत्येक नक्षत्राचा कौल यावेळी तपासण्यात येतो. यात अश्विनी (राजा) भरणी ( प्रधान) कल्याणी कृतिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्प, आश्लेषा, मघा, पूर्वा उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा व ज्येष्ठा या 18 नक्षत्राचा कौल बालभैरवनाथ व माता जोगेश्वरीने दिला आहे.

यामध्ये अश्विनी, भरणी, कल्याणीकृतिका नक्षत्रुपी वडाच्या पानात मध्यम स्वरूपातील पाणी निघाल्याने मध्यम पाऊस पडणार असल्याचे यात सांगितले, रोहिणी मृग आर्द्रा, पुनर्वसु, पुष्पा आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा व जेष्ठा नक्षत्रावर रुपी खड्ड्यामध्ये चांगले पाणी निघाल्याने या नक्षत्रामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे होईक सांगण्यात आले. चालू वर्षी खरीप व रब्बी दोन्ही हंगाम चांगले असून पावसाचे प्रमाण वेळेत होणार असल्याने अन्नधान्य मुबलक पिकेल. बुधवार 29 मार्च रोजी तेलवन पडणार असून 30 मार्चपासून रामनवमीच्या दिवसापासून पाच दिवस नवरात्र उपवास चालणार आहे. मंगळवार दिनांक 4 एप्रिल रोजी रथोत्सव व बुधवार दिनांक 5 एप्रिल रोजी यात्रा व हंगामा उत्सव होणार आहेे. पंचांग वाचन व पर्जन्य अंदाजासाठी चांदेकसारे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, यात्रा कमिटी व राम रतन पंचायतन ट्रस्टचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यंदा धान्य समृध्दी, गोधड महाराज संवत्सरीतील भाकित

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

यावर्षी चांगला पाऊस पडून धान्य समृद्धी होणार आहे मात्र वादळ व अतिवृष्टीचा धोका आहे. त्याचबरोबर रोगराई वाढणार आहे. लोकांमध्ये मैत्री वाढून लोक सुखी राहणार आहेत असे भाकित कर्जत येथील गोधड महाराज यांच्या संवत्सरीतून वर्तवण्यात आले.

कर्जत येथील थोर संत सद्गुरू गोधड महाराज यांनी इतर ग्रंथ संपदेबरोबर संवत्सरीत जागतिक पातळीवरील भविष्य लिहून ठेवले आहे. प्रत्येक वर्षी चैत्र पाडवा या दिवशी या भविष्याचे वाचन करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे.

आज मंदिरामध्ये हभप पंढरीनाथ काकडे व अनिल काकडे यांनी या वर्षीचे भाकीत काय आहे ते यावेळी महाराजांच्या संवत्सरीवरून सांगितले. यावेळी पंचक्रोशी मधून मोठ्या संख्येने भावीक उपस्थित होते.

यावर्षीचे संवत्सराचे नाव शुभनाम आहे. यावर्षी चांगला पाऊस पडून धान्य समृद्धी होणार आहे मात्र लोकांमध्ये मैत्री वाढवून लोक सुखी राहणार आहे. यावर्षी आगामी काही महिन्यांमध्ये सर्वत्र जोरदार वादळ व अतिवृष्टीचा धोका देखील वर्तवण्यात आला आहे. खरीप हंगामामध्ये पाऊस ओढ देणार आहे. मात्र त्यानंतर भरपूर पाऊस पडून धान्य देखील भरपूर येणार आहे.

यावर्षी पाऊस हा परीट घरी पडणार आहे असे वर्तवण्यात आले आहे. धरण क्षेत्रामध्ये पाऊस भरपूर यावर्षीच्या पावसाचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे धरण व मोठ्या नद्या ज्या परिसरामध्ये आहेत त्या ठिकाणी भरपूर व जोरदार पाऊस पडणार आहे जमिनीवर पडणार्‍या पावसाचे प्रमाण कमी दाखवण्यात आले आहे. मात्र असे असले तरी देखील पुरेसा पाऊस पडून पिके चांगली येणार आहेत. सध्या सर्वत्र मंदी आहे आणि आणखी पुढील काळामध्ये देखील मंदीचे सावट सर्वच क्षेत्रांमध्ये राहणार आहे.

जागतिक पातळीवर युद्धाचा धोका

जागतिक पातळीवर मात्र युद्ध सुरू राहणार असून काही देशांचे विघटन म्हणजे तुकडे होणार आहेत. यामुळे युद्धाचा धोका पुढील काळामध्ये देखील वर्तवण्यात आला आहे.

अधिक मासात अधिक पाऊस, नागेश्वर मंदिरात होईक

पारनेर |प्रतिनिधी| Parner

खरीप व रब्बी हंगामात अत्यंत कमी प्रमाणात व असमाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज आज, बुधवारी परंपरागत अढी-गुढी (होईक) कार्यक्रमात वर्तवण्यात आला. पावसा अभावी खरीप व रब्बी हंगामातील शेती उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे तसेच येत्या वर्षात तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज होईकात वर्तवण्यात आला.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने पारनेरचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर मंदिराच्या प्रांगणात परंपरेप्रमाणे येत्या वर्षातील पर्जन्यमान व पीक परिस्थितीबाबत अंदाज वर्तवण्यात आला.

अढी-गुढी (होईक) साठी मंदिराच्या प्रांगणात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला, अधीक मासासह एकूण तेरा मराठी महिन्यांचे तेरा तसेच राजा व प्रधान यांचे प्रत्येकी एक असे एकूण पंधरा आढ्या (खड्डे) घेण्यात आल्या. या आढ्यांमध्ये पाणी भरण्यात आले. पाणी जिरल्यानंतर त्यात हळद लावलेली ज्वारी वडाच्या पानांत गुंडाळून आढ्यांमध्ये ठेवण्यात आली. त्यावर दगड ठेवण्यात आले. आढ्या पुन्हा पाण्याने भरण्यात आल्या.

काल, बुधवारी सकाळी पोलीस पाटील प्रतापराव औटी व भैरवनाथ मंदिराचे पुजारी संतोष पुजारी यांनी आढ्यांचे पूजन केले. त्यानंतर मराठी वर्षातील महिन्यांच्या क्रमाने आढ्यांमधील वडाच्या पानात गुंडाळलेली ज्वारी बाहेर काढण्यात आली. अधिक महिना वगळता इतर सर्व आढ्यांमधील वडाची पाने कोरडी निघाली. त्यावरून येत्या वर्षात असमाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.

तसेच येत्या वर्षात रोगराई, महागाईचा अंदाज वर्तवण्यात आला.ग्रामदैवत श्री. नागेश्वर मंदिराचे गुरव योगेश वाघ यांनी पंचाग पूजन व संवत्सर वाचन केले. विश्वस्त संजय वाघमारे, शिरीष शेटीया, रमेश आडसुळ, धोंडीभाऊ पुजारी, विजय डोळ, सचिन पुजारी, दिलीप ठुबे, संभाजी कापरे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक मासात अधिक पाऊस

पाडव्याच्या दिवशी वर्तविण्यात आलेल्या होईकामध्ये अधिक मासामध्ये अधिक पर्जन्यवृष्टी हाईल तर उर्वरीत मासांमध्ये बेताची पर्जन्यवृष्टी होणार असल्याचा व्होरा वर्तविण्यात आला आहे. कल्याण कृतीका नक्षत्रात पारनेरसह पंचक्रोशीतील वाड्यांमध्ये पशुहत्या बंदी पाळण्यात येते. या नक्षत्रात पशु पक्षी हत्या केली तर दुष्काळाला तोंड द्यावे लागते अशी ग्रामस्थांची श्रध्दा आहे. यावर्षी 11 मे ते 24 मे 2023 दरम्यान कल्याण कृतीका नक्षत्र असल्याने पशुपक्षांची हत्या करू नये असे आवाहन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या