Saturday, April 27, 2024
Homeजळगावमान्सुनपूर्व पावसाचा तडाखा

मान्सुनपूर्व पावसाचा तडाखा

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

मध्यरात्री दोन वाजेनंतर वातावरणात अचानक बदल होऊन शहरासह परिसरात पहाटे चार वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वार्‍यामुळे काही ठिकाणी वृक्षाच्या फांद्या तुटून पडल्या.

- Advertisement -

तर जोरदार पावसामुळे शहरातील वीज पुरवठा काही वेळासाठी खंडित करण्यात आल्याने जळगावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. पहाटे चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस चार ते पाच वाजेपर्यंत सुरु होता. त्यानंतर दीड ते दोन तास पावसाची रिपरिप सुरुच होती.

अचानक आलेल्या वादळी पावसामुळे पत्र्याच्या घरावर मुसळधार पावसाच्या सरीच्या आवाजाने साखर झोपेत असणार्‍या चाकरमान्यांची झोपच उडाली. तसेच या पावसामुळे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात बाहेर पडलेल्या मका, टरबू,गंगाफळ व इतर साहित्याचे काही ठिकाणी नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, रोहिणी नक्षत्रच्या सुरुवातीलाच झालेल्या पावसामुळे शेती मशागतीच्या कामांसाठी शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. मात्र, पाऊस उघडल्यानंतर वातावरणात प्रंचड उकाडा जाणवत असून नागरिकांना घामाच्या धारा असह्य होत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत 30 क्विंटल मका गेला वाहून

शहरात रविवारी पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. वीज, वादळासह झालेल्या पावसामुळे जळगाव बाजार समितीमधील श्रीदत्त ट्रेडींग या कंपनीचा बाहेर असलेला 30 क्विंटल मका वाहून गेल्याने नुकसान झाल्याची घटना घडली आहे. अंदाजे 45 हजारांचे नुकसान झाले असल्याची माहिती श्रीदत्त टे्रडींग कंपनीचे सचिन शेटे यांनी दिली. दरम्यान, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने बाजार समिती बंद असल्यामुळे कोणीही या नुकसानी पाहणी केली नाही. श्रीदत्त ट्रेडींग कंपनीचे सचिन शेटे हे संचालक आहेत. ते शेतकर्‍यांकडून ठोक स्वरुपात खरेदी करतात. नेहमीप्रमाणे शनिवारीही सचिन शेटे यांनी एका शेतकर्‍याचा मक्याचा माल खरेदी केला.

कामगार नसल्याने हा माल गोदामात ठेवता आला नाही. तो माल दुकानाच्या बाहेर पडून राहिला. रविवारी पहाटेच्या चार वाजेच्या सुमारास अचानकपणे जोरदार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह तब्बल एक ते दीड तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे श्रीदत्त ट्रेडींग कंपनीच्या दुकाना बाहेर असलेला 30 क्विंटल मका हा पावसाच्या पाण्यात वाहून गेला. सकाळी आठ वाजता सचिन शेटे हे बाजार समितीत आले असता, त्यांना त्यांच्या ट्रेडींगच्या दुकानाबाहेर ठेवलेला 30 क्विंटल मका पावसाच्या पाण्यात वाहून गेला असल्याचे दिसून आले. काही कामगार लावून त्यांनी हा मका गोळा केला. मात्र, पाण्यामुळे संपूर्ण मका खराब झाल्यामुळे हाती काहीच लागले नाही. 30 क्विंटल मका वाहून अंदाजे 45 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे श्रीदत्त ट्रेडींग कंपनीचे संचालक सचिन शेटे यांनी ‘देशदूत’शी बोलतांना सांगितले. दरम्यान, पहाटेच्या जोरदार पावसामुळे जळगाव बाजार समितीत उघड्यावर विक्रीसाठी शेतकर्‍याने आणलेले गंगाफळ यासह गाजर व इतर वस्तूंचेही नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

रस्त्यावर चिखलमय वातावरण

जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी गटारी तुंबले असून तर सकल भागात पाणी साचले होते. तसेच शहरातील अनेक भागात भुयारी गटारी,अमृत योजनेच्या कामामुंळे खोदकाम झालेले असल्याने या परिसरातील रस्त्यावर चिखलमय वातावरण निर्माण झाले होते. पाऊस उघडल्यानंतर या रस्त्यांवरुन ये-जा करणार्‍या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागल्याने अनेक वाहनधारकांची फज्जीती झाली.

शिवतिर्थ मैदानावर साचले पाणी

शहरात मान्सुनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शहरातील शिवतिर्थ मैदानावर लांबपर्यंत पाण्याचे पाणीच पाणी साचल्याने मैदान जणूकाही तळ्याप्रमाणेच भासत होते. या साचलेल्या पाण्यातून वाट काढत वाटसरु कसरत करत जात होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या