वीज निर्मितीत स्वयंपूर्ण होणारे साई संस्थान देशातील दुसरे देवस्थान ठरणार

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानने 15 वर्षापूर्वीच अपारंपरिक उर्जा स्त्रोतांपासून वीजनिर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत 15 कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे वीज बिलात वार्षिक दोन कोटींची बचत होत आहे. आशियातील सर्वात मोठ्या साई प्रसादालयातही देशातील सर्वात मोठ्या सोलर सिस्टिम प्रकल्पामुळे वर्षाकाठी 1 कोटी रुपयांची बचत होत आहे. तिरुपतीनंतर वीज निर्मितीत स्वयंभू होणारे साई संस्थान हे देशातील दुसर्‍या क्रमाकांचे देवस्थान ठरले आहे. आता दररोज आणखी 10 मेगावॅट वीज निर्मितीसाठी ग्रीड कनेक्टेड सोलर पॉवर प्रकल्प व 11 कोटी रूपये खर्च असलेला व त्यातून दररोज 1 ते 1.50 मेगावॅट निर्मीती करण्यासाठी रुफ टॉप सोलर प्रकल्प सुरू करण्याबाबत तयारी सुरू आहे.

देशात शिर्डी हे सर्वाधिक गर्दीचे क्रमांक एकचे तर श्रीमंतीत क्रमांक दोनचे देवस्थान आहे. येथे दररोज येणार्‍या लाखो भाविकांना सोयी-सुविधा पुरवताना वीज बिल व इंधनासाठी वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत होता. यावर उपाय म्हणून संस्थानने सुपा (ता. पारनेर) येथे 15 कोटी खर्च करून 2007 मध्ये 2.5 मेगावॅट क्षमतेचा पवन उर्जा प्रकल्प उभारला. हा प्रकल्प देश- विदेशातील तीर्थस्थळांसाठी रोल मॉडेल ठरला. 2007 पासून आजपर्यंत या प्रकल्पातून सुमारे 6 कोटी 96 लाख 27 हजार 440 युनिटची विक्रमी वीजनिर्मिती झाली. ती राज्य वीज मंडळाला दिली जाते. त्यातून वर्षाकाठी दोन कोटी रुपयांचे उत्पन्नही साईंच्या झोळीत जमा होत आहे.

सोलर सिस्टिम कुकिंग प्रकल्प दिशादर्शक

साई प्रसादालयात अन्न शिजवण्यासाठी सोलर सिस्टिमचा वापर करण्यात येतो. हा प्रकल्प कार्यान्वित होण्यापूर्वी प्रसाद भोजन, नाश्ता पाकिटे, लाडू प्रसाद बनवण्यासाठी एलपीजी गॅसचा इंधन म्हणून वापर होत होता. त्यासाठी 550 मेट्रिक टन गॅस लागत होता. संस्थानने खर्चाची बचत व्हावी आणि प्रदूषण टाळण्यासाठी प्रसादालयाच्या 1168 चौरस मीटर छतावर 1 कोटी 33 लाख खर्च करून स्वयंचलित सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित केला. यामुळे वर्षाकाठी 128 मेट्रिक टन इंधन गॅसची बचत होऊन 1 कोटी रुपयांची बचत होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प दिशादर्शक व फायदेशीर ठरला असून केंद्र व राज्य सरकारकडूनही या प्रकल्पाचा गौरव झाला आहे.

भक्त निवासातही सोलर सिस्टीम

संस्थानच्या भक्तनिवासात 12 हजार भाविक थांबतील अशी व्यवस्था असून तेथे 24 तास गरम पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रति दिवसाला 5 लाख 11 हजार लिटर क्षमतेची सोलर हॉट वॉटर सिस्टीम बसवण्यात आली आहे. त्यामुळे विजेचा वापर कमी होऊन आर्थिक बचत झाली आहे.

साईबाबा संस्थानच्या सुपा येथे अपारंपरिक उर्जा स्त्रोतापासून वीज निर्मितीच्या यशस्वी प्रयोगानंतर सर्वात मोठ्या साईबाबांच्या भोजन प्रसादालयात देशातील सर्वात मोठा सोलर स्टीम कुकिंग प्रकल्प निर्माण केला. आता साईसंस्थानच्या विविध भक्तनिवासांच्या छतावर रुफ टॉप सोलर सिस्टीम प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी शासन स्तरावर प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे.

– राहुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *