Wednesday, April 24, 2024
Homeनगरतलावाचे नुकसान करणार्‍या शेतकर्‍यावर कारवाईसाठी आंदोलन

तलावाचे नुकसान करणार्‍या शेतकर्‍यावर कारवाईसाठी आंदोलन

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील कासारवाडी येथील एका शेतकर्‍याने गाव तलावाची नासधूस करून भिंत व सांडवा तोडल्याने गावातील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर संबंधित शेतकर्‍यावर गुन्हा दाखल करून व तलावाची पूर्ववत असणारी स्थिती करावी, या मागणीसाठी बैठा सत्याग्रह आंदोलन केले.

- Advertisement -

आंदोलनात राष्ट्रवादीचे अमोल वाघ, इरफान पठाण, उत्तमराव कासार, बाबासाहेब कासार, लक्ष्मण कासार, शिवाजी कासार, आजिनाथ कासार, राधाकिसन कासार, अ‍ॅड. राजेंद्र कासार, संभाजी कासार, भिमराज कासार, नारायण कासार, पंडित कासार, अशोक कासार, गोरख कासार, अंशाबापू कासार, संजय वाघ, नाथा कासार आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. जवखेडे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कासारवाडी येथील गाव तलाव सुमारे 35 वर्षांपूर्वी शासनाच्या खर्चातून बांधण्यात आला.दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. सध्या हा तलाव जिल्हा परिषद अंतर्गत असून एका शेतकर्‍याने दोन वर्षांपूर्वी तलावाजवळ जमीन विकत घेतली असून जेसीबीच्या साह्याने तलावाची भिंत सुमारे 200 फूट खोदून नष्ट केली आहे. सांडवाही पूर्णपणे बुजवला आहे. याबाबत तालुका प्रशासनाला यापूर्वी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. दखल घेतली गेली नाही.

तलावाची भिंत काढल्याने तलावात पाणी साठा राहाणार नाही. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागतील, असे ग्रामस्थांनी सांगितले. सरकारकडून आतापर्यंत लाखो रुपये खर्च या तलावावर केला आहे. तो पूर्ण वाया जाणार आहे. तलावाच्या आसपासच्या शेतकर्‍यांच्या शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. ग्रामस्थांनी यापुर्वीच तहसीलदार शाम वाडकर यांना भेटून याबाबत कारवाई करण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाने फक्त पत्रव्यवहार करून हात झटकले. सरकारी मालमत्ता असताना आडमुठी भूमिका घेणारा एका शेतकर्‍याने सरकारी तलावाचे मोठे नुकसान करून संपूर्ण परिसराला वेठीस धरले आहे, यावर अधिकार्‍यांचा वचक राहिलेला नाही, अशी चर्चा आंदोलकांमध्ये होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या